Pooja Sawant Shared Emotional Post : सध्या सर्वत्र नवरात्रीनिमित्त आनंदमय वातावरण निर्माण झालं आहे. आज २२ सप्टेंबर रोजी नवरात्रीला सुरुवात झाली आहे. यानिमित्त अनेक सेलिब्रिटींनीही पारंपरिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्रींनी पांढऱ्या शुभ्र रंगाच्या साड्या परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता अभिनेत्री पूजा सावंतनेही पोस्ट शेअर केली आहे.

पूजाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने यावेळी देवीच्या देवळातील काही फोटोही पोस्ट केले आहेत. या पोस्टला तिने छान कॅप्शनही दिली आहे. यामधून तिने यंदा ती कामानिमित्त मुंबईबाहेर असल्याने तिने घटस्थापनेच्या दिवशी घरी नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

पूजा सावंतची भावुक पोस्ट

या पोस्टमधून ती म्हणाली, “घटस्थापनेला मी घरी नसण्याची ही पहिलीच वेळ. कामानिमित्त मुंबईबाहेर शूटिंग करतेय, आज पहिल्यांदा देवीची स्थापना माझ्या डोळ्यांदेखत नाही झाली. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. पण, शेवटी ती आईच.. तिचं लक्ष तिच्या बाळांवर नेहमी असतं.. एका वेगळ्या रुपात तिचं आज दर्शन झालं. जय जगदंब! सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!”

पूजा सध्या मुंबईबाहेर सोनाई या ठिकाणी शूटिंग करत आहे. याबद्दल तिने शेअर केलेल्या पोस्टमधून पाहायला मिळतं. यावेळी अभिनेत्रीने तेथील देवीच्या मंदिरातील फोटो शेअर केले आहे. देवीच्या गाभाऱ्यातील फोटो, तसेच मंदिराच्या परिसरातील फोटो पूजाने पोस्ट केलेत.

पूजा सावंत नेहमी तिच्या कुटुंबाबरोबर सगळे सणवार उत्सहात साजरे करत असते. गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी यांसारखे सगळे सण ती साजरे करताना दिसते; अनेकदा ती यासंबंधित फोटो पोस्ट करत असते.

पूजा सावंत सध्या तिच्या आगामी ‘कपबशी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. यामध्ये तिच्याबरोबर अभिनेता ऋषी मनोहर झळकणार आहे. पढच्या वर्षी २६ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दोघे या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत, त्यामुळे या चित्रपटात त्यांच्या भूमिका व केमिस्ट्री कशी असेल हे पाहणं रंजक ठरेल.