Prarthana Behere Knee Surgery : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, यामधून अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचं दिसत आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमधून याबाबतची माहिती दिली आहे. प्रार्थनाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याचं दिसत आहे. तिच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्याचंही तिने यामधून सांगितलं आहे.
अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोंखाली कॅप्शनमधून तिच्या डाव्या पायाच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्याचं सांगितलं आहे. या फोटोंमधून ती तिच्या घरी बसलेली असून सध्या शस्त्रक्रियेनंतर आराम करत असल्याचं दिसत आहे. प्रार्थना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. शिवाय यासह ती तिचे अनेक वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. प्रार्थनाचे इन्स्टाग्रामवर २५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
प्रार्थना लवकरच तिच्या नवऱ्याने दिग्दर्शन केलेल्या चित्रपटातून झळकणार आहे. यापूर्वी तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, अभिनेत्री पहिल्यांदाच नवऱ्याच्या चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘राजश्री मराठी’च्या वृत्तानुसार तिचा नवरा अभिषेक जावकर दिग्दर्शित चित्रपटाचा नुकताच मुहूर्त पार पडला आहे. अद्याप या चित्रपटाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. ७ मे २०२५ रोजी अभिनेत्रीने या संदर्भातील माहिती सोशल मीडियावरून शेअर केली होती.
दरम्यान, प्रार्थना शेवटचं ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटातून झळकली होती. यामध्ये तिच्यासह अभिनेत्री प्राजक्ता माळी, स्वप्नील जोशी, वनिता खरात, प्रसाद खांडेकर हे कलाकार झळकले होते. प्रसाद खांडेकरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आता अभिनेत्री अभिषेक जावकर दिग्दर्शित चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकणार आहे.