Prasad Oak Shares Memory of Laxmikant Berde : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी आपल्या अभिनयाने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेले लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या अनेक आठवणी मराठी प्रेक्षकांच्या मनात आहेत. अनेक चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीदेखील त्यांची आठवणी शेअर करीत असतात.
अनेक मराठी आणि हिंदी कलाकार मंडळी लक्ष्मीकांत बेर्डेंविषयीची आठवण काढत त्यांच्याबद्दलचे किस्से किंवा आठवणी सांगतात. अशातच मराठी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दलची एक जुनी आठवण सांगितली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत प्रसादने लक्ष्मीकांत यांच्याबरोबर केलेल्या कामाची एक जुनी आठवण शेअर केली.
प्रसाद ओक लवकरच त्याचा आगामी १००वा ‘वडापाव’ हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात त्याच्याबरोबर गौरी नलावडे, रितिका श्रोत्री, अभिनय बेर्डेसह अनेक कलाकार मंडळी आहेत. याच सिनेमानिमित्ताने प्रसाद अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीतून त्याने लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबरच्या कामाची आठवण सांगितली. शिवाय प्रसादने लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनयचं कौतुकही केलं.
कलाकृती मीडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद म्हणाला, “लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम करण्याची माझी प्रचंड इच्छा होती. काही अंशी ती इच्छा पूर्ण झालीदेखील… मी एक नाटक करत होतो आणि त्या नाटकाच्या तालमीसाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर १५-२० दिवस एकत्र काम केलं. त्यात माझी मुख्य भूमिका होती आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे पाहुणे कलाकार म्हणून असणार होते. मात्र, तेव्हाच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना ते नाटक करता आलं नाही, त्यामुळे त्यांच्याबरोबर नाटक किंवा सिनेमामधून एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही.”
प्रसाद ओक इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे प्रसाद लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय बेर्डेबद्दल म्हणतो, “मला लक्ष्मीकांत यांच्याबरोबर काम करता आलं नाही, त्यामुळे कदाचित मी आता त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेबरोबर काम करीत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे खूपच शिस्तप्रिय होते, तोच गुण अभिनयमध्येही आहे. अभिनय लाघवी, प्रेमळ आणि माणसं जोडणारा आहे. कामाप्रति आदर असलेला अभिनेता आहे. एखादी गोष्ट तो खूप मनापासून करतो. अभिनय सगळ्याच गोष्टींचा मनापासून आनंद घेतो. लक्ष्मीकांत यांनी अनेक हिट्स सिनेमे दिले आहेत, तशीच आता अभिनयच्याही हिट्स सिनेमांची सुरुवात झाली आहे.”