Prasad Oak : नाटक, मालिका, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेता प्रसाद ओकने आपला ठसा उमटवला आहे. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या प्रसाद त्याच्या ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. काही महिन्यांआधीच अभिनेत्याने मुंबईत सुंदर घर घेतलं. त्याच्या नव्या घराच्या वास्तुशांतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहिले होते. मुंबईत अंधेरी सारख्या ठिकाणी घर घेणं ही मोठी गोष्ट आहे आणि हे स्वप्न कसं पूर्ण केलं याबद्दल प्रसादने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

प्रसाद ( Prasad Oak ) म्हणाला, “मला मुंबईत येऊन २५ ते २८ वर्षे झाली आहेत. भाड्याच्या छोट्या घरात सुरुवातीला आम्ही राहायचो. मग लग्न झालं, बायको आली…मुलं झाली. हळुहळू आम्ही कालांतराने स्वत:चं घर घेतलं. पण, माझ्या बायकोचं खूप आधीपासून अंधेरीत घर घ्यायचं असं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करणं अशक्य होतं. कारण, मी काम करायला सुरुवात केली, तेव्हा फक्त नाटक होतं. चॅनेल्स वगैरे नव्हते. ही जवळपास १९९६-९७ ची गोष्ट आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, मुंबईतल्या पहिल्या नाटकासाठी मला ६० रुपये नाइट होती. या कमाईत मी अंधेरीत घर घ्यायचं स्वप्न पाहूच शकत नव्हतो.”

हेही वाचा : ८०० कोटींचा पतौडी पॅलेस रंगवण्याऐवजी सैफ अली खानने लावला चुना; सोहा अली खान म्हणाली, “आजोबांचे पैसे…”

प्रसाद ( Prasad Oak ) पुढे म्हणाला, “त्या पहिल्या नाटकापासून आजपर्यंत मी खूप मोठा प्रवास केलाय. ९० च्या वर मालिका केल्या. शंभरच्यावर चित्रपट केले. माझी मुलं मोठी झाली. त्यांचा एक प्रवास सुरू झाला. मग, माझ्या लक्षात आलं मी माझ्या बायकोचं स्वप्न आता पूर्ण नाही करणार तर, केव्हा करणार? एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे ‘धर्मवीर’ चित्रपटाची ऑफर आली. माझा लूक वगैरे फायनल झाला. शिंदे साहेब ट्रेलर लॉन्चला आले होते. त्यामुळे लोकांना असं वाटू लागलं मी त्यांच्या खूप जवळचा आहे. पण, या ३ वर्षांच्या प्रवासात ते माझ्याशी फक्त दोन ते तीन वेळा बोलले आहेत. त्यांचा या सगळ्यात काहीच सहभाग नाही.”

हेही वाचा : Video : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले मराठी कलाकार! एकत्र आरती करून घेतलं बाप्पाचं दर्शन, शर्मिष्ठाने शेअर केला व्हिडीओ

माझ्या स्वकमाईतून घर घेतलं – प्रसाद ओक

अभिनेता पुढे सांगतो, “मी २५-२८ वर्षे राबून, घासून, मेहनतीने थोडी-थोडी पुंजी बाजूला काढून माझ्या बायकोचं स्वप्न साकार करण्यासाठी झटलो… मी तिच्या आनंदासाठी सगळं साध्य केलं. अंधेरीत मोठं घर घेतलं आणि लोक म्हणायला लागले हे शासकीय कोट्यातून मिळालंय. तुम्हाला धक्का बसेल…ज्यांना मी या इंडस्ट्रीत जवळचे मित्र मानतो त्यांनीच असं पसरवलंय. अरे मी लाचार नाही…मला स्वाभिमान आहे. मला असं कुणी दिलेलं घर नकोय. मला माझ्या बायकोचं स्वप्न पूर्ण करायचं होतं…ते माझ्या स्वत:च्या कमाईचं घर आहे आणि ही गोष्ट मी कागदोपत्री सिद्ध करू शकतो. या ट्रोलर्सकडे मी लक्ष देत नाही कारण, ते माझं घर चालवायला येत नाहीत. आम्ही नव्या घराची वास्तुशांती ठेवली होती. त्यावेळी साहेब आमच्या घरी रात्री ११ वाजता वास्तुशांतीला आले होते. तेच फोटो मी पोस्ट केले आणि त्यावरून लोकांनी चर्चा केल्या. पण, असं काही नाहीये.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
 prasad oak
मराठी अभिनेता प्रसाद ओक ( prasad oak )

“माणसाची स्वकमाई, आई-वडिलांची पुण्याई, बायकोची साथ, मुलं या सगळ्यांमुळे चांगल्या गोष्टी वाट्याला येतात. बाकी मला कोणाचाही राजाश्रय नको…त्यांची माझी ओळख आहे, मला त्यांचं काम खूप आवडतं. अतिशय स्वच्छ मनाने लोकांचं काम ते करतात आणि यापलीकडे त्यांच्याकडून मला काहीच अपेक्षा नाहीत. त्यामुळे एवढंच सांगेन माझं घर मी माझ्या स्वत:च्या हिंमतीवर आणि माझ्या घामाच्या पैशांनी घेतलंय. त्यामुळे या फालतू ट्रोलर्सकडे मी लक्ष देत नाही.” असं स्पष्ट मत प्रसाद ओकने ( Prasad Oak ) मांडलं.