Priya Bapat & Umesh Kamat Celebrate First Ganeshutsav In New Home : मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून प्रिया बापट व उमेश कामत यांच्याकडे पाहिलं जातं. प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीने यंदा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता उमेश-प्रियाने यंदाचा गणेशोत्सव त्यांच्या नव्या घरात साजरा केला आहे.

यावर्षीचा गणेशोत्सव का खास ठरला हे सांगताना प्रिया बापट लिहिते, “नव्या घरातील आमचा पहिला गणेशोत्सव. आमचे अनेक मित्रमंडळी, नातेवाईक घरी आले होते… महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांसाठी मी स्वत: जेवण बनवलं होतं. खूप गप्पा मारल्या, हसलो इतकी मजा केली की आता आवाज पण बसलाय. सगळ्यांचा पाहुणचार करण्यात इतका वेळ गेला की आम्ही आमच्या गणु बाप्पाबरोबर फोटो देखील काढले नाहीत…आणि आमच्या मित्रमंडळींबरोबर फोटो काढायला सुद्धा वेळ मिळाला नाही. पण, या सगळ्या आठवणी कायम आमच्याबरोबर राहतील. मी या आठवणी कायम जपून ठेवेन.”

“आज बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलीये… किती सुंदर गेले हे ७ दिवस. मी खरंच शब्दांतही सांगू शकत नाही. फक्त कृतज्ञता व्यक्त करते.” असं प्रियाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

प्रिया बापटने बनवले ‘हे’ खास पदार्थ

प्रियाने बाप्पासाठी खास नैवेद्य बनवला होता. वरण-भात, तीन प्रकारच्या भाज्या, पोळी, कोशिंबीर, गोडाचा पदार्थ, चटणी, पापड असे सगळे पदार्थ प्रियाने बनवले होते. याशिवाय उकडीचे मोदक, बेसनाचे लाडू, खांडवी या चविष्ट पदार्थांची झलक सुद्धा अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान, प्रिया-उमेशने लग्नाआधी जवळपास ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर उमेश-प्रियाची प्रमुख भूमिका असलेला ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा नवीन सिनेमा येत्या १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.