Priya Bapat & Umesh Kamat Video : प्रिया बापट व उमेश कामत यांच्याकडे मराठी मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. सध्या हे दोघंही त्यांच्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा येत्या १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. याचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्यात प्रिया आणि उमेश यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सगळ्याच प्रश्नांची अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं.
प्रिया बापट आणि उमेश कामत ‘बिन लग्नाची गोष्ट’ या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. यापूर्वी त्यांनी २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टाइमप्लीज’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होते.
या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला पुष्करने प्रियाला खास प्रश्न विचारला. “गेल्या काही वर्षांत उमेशला आवडतील अशा कोणत्या गोष्टी शिकलीस?” यावर प्रिया म्हणाली, “हो मग शिकले ना… त्याला आवडतं म्हणून आणि त्याने बाहेरचं जरा कमी खावं यासाठी मी नॉनव्हेज पदार्थ बनवायला शिकले. नाहीतर मी नॉनव्हेज पदार्थांना हातही लावायचे नाही. अर्थात, जेवढे चांगले मी व्हेज पदार्थ बनवू शकते, जे मी घरी रोजच बनवते; तेवढं मी नॉनव्हेज रोज बनवत नाही.” त्यामुळे नॉनव्हेज पदार्थ बनवायला फक्त उमेशसाठी शिकले अन्यथा मी शाकाहारी पदार्थ चांगले बनवू शकते असं प्रियाने सांगितलं.
बायकोचं उत्तर ऐकून उमेश म्हणाला, “आता माझं सांगायचं झालं, तर माझ्यात हिच्यामुळे महत्त्वाचा बदल झाला तो असा की, हिच्यामुळे मी खूप आवडीने शाकाहारी पदार्थ खाऊ लागलो. मला आता व्हेज पदार्थ आवडू लागलेत… हा माझ्यात झालेला सर्वात मोठा बदल आहे.”
दरम्यान, ‘बिन लग्नाची गोष्ट या सिनेमात प्रिया-उमेशसह निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने असे लोकप्रिय कलाकार एकत्र झळकणार आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित या सिनेमाचे सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत.