Priya Bapat praises Umesh Kamat: सध्या अनेक बॉलीवूड, हॉलीवूड तसेच मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. जुलै महिन्यात ‘मेट्रो इन दिनों’, ‘कालीधर लापता’, ‘आँखो कि गुस्ताखियां’, ‘मालिक’, ‘सुपरमॅन’ असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. आता या सगळ्यात एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, ईशान खोपकर, विशाखा सुभेदार हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यावर प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याच्या कमेंट केल्या होत्या. तसेच चित्रपटातील गाण्यालादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

‘येरे येरे पैसा ३’चा प्रीमिअर सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. चित्रपट पाहिल्यानंतर कलाकारांनी चित्रपटावर, कलाकारांच्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या कलाकारांनी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी आवाहन केले आहे.

आता अभिनेत्री प्रिया बापटनेदेखील चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच पती उमेश कामतच्या चित्रपटातील कामाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियाने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत लिहिले की, मला हसायला खूप आवडतं आणि त्यात हसत हसत डोकं गुंतवून टाकणारी पटकथा असेल तर मजा येते. सगळ्या कलाकारांचा अभिनय अफलातून आहे, तसेच ऊर्जेने भरलेला आहे. उत्तम पटकथा आणि संकलन असलेला चित्रपट संजय दादाच्या दिग्दर्शनाने खिळवून ठेवतो.

प्रिया बापट काय म्हणाली?

पुढे प्रियाने पती उमेश कामतचे कौतुक करीत लिहिले, “उमेश तुझ्या अभिनयातील सहजता आणि निरागसतेच्या मी २० वर्षांपूर्वी प्रेमात पडले. या चित्रपटातून तुझ्यासाठी स्लॅपस्टिक कॉमेडीचं (slapstick comedy) नवं आव्हान तू स्वीकारलंस आणि लीलया पेललंस. आज मी खूप आनंदी आहे आणि मी तुझी पत्नी आहे याचा मला अभिमान वाटतो. तू पुन्हा सिद्ध केलंस की, तुला कुठल्याही सीमारेषा नाहीत आणि उत्तम संधी मिळाली तर त्यात कमाल बहर आणशील”, असे म्हणत प्रियाने ‘येरे येरे पैसा ३’मध्ये उमेशने साकारलेल्या पात्राचे कौतुक केले.

तसेच प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी आवाहनदेखील केले. प्रियाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये प्रिया, उमेश, संजय जाधव, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, हर्षदा खानविलकर हे कलाकार दिसत आहेत. एका फोटोमध्ये ‘येरे येरे पैसा ३’चे पोस्टर पाहायला मिळत आहे, तर एक फोटो शूटिंगदरम्यानचा असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘येरे येरे पैसा ३’च्या ट्रेलरमध्ये उमेश कामतच्या भूमिकेची झलक पाहायला मिळाली. त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून कौतुक होताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा चित्रपट १८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. पहिल्या दोन भागांना ज्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला, तसाच प्रतिसाद तिसऱ्या भागाला मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.