अभिनेत्री सई ताम्हणकरने काही महिन्यांपूर्वी मुंबईत स्वत:चं पहिलं घर घेतलं. सांगलीहून मुंबईला आलेली सई गेली अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत होती. सईने तिच्या युट्यूब चॅनेलवर नव्या घराची झलक शेअर केल्यावर कलाकार मंडळींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता दिवाळीचं औचित्य साधून अभिनेत्रीने तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना खास कार्यक्रमाचं आयोजन करून घरी आमंत्रित केलं होतं. याचे फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हेही वाचा : “…आणि हे मराठी कलाकार”, टीका करणाऱ्याला हेमांगी कवीचं रोखठोक उत्तर; म्हणाली, “किती नकारात्मक…”
सई ताम्हणकरने तिच्या नव्या आलिशान घराला ‘द इलेव्हन्थ प्लेस’ असं नाव दिलं आहे. अभिनेत्रीने नव्या घराचा व्हिडीओ शेअर केल्यावर यामधील शोभेच्या वस्तू, मोठ्या खिडक्या, आकर्षक फर्निचर, मोठा वॉर्डरोब, हॉलमध्ये ठेवलेली झाडं आणि प्रशस्त खोल्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
नव्या घरासाठी सईला तिच्या मराठी कलाविश्वातील जवळच्या मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या होत्या. आता दिवाळीचं औचित्य साधून तिने या सगळ्या मित्रांना घरी आमंत्रित केलं होतं. आपल्या मित्रमंडळींसाठी सईने खास ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याचे बरेच फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सईचं नवं घर पाहण्यासाठी आणि तिला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रिया बापट, सारंग साठ्ये, कादंबरी कदम, समीर विध्वंस, उमेश कामत असे बरेच कलाकार पोहोचले होते. प्रिया बापट या कार्यक्रमाचे फोटो शेअर करत लिहिते, “खूप प्रेम सई ताम्हणकर…या सुंदर दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी खूप खूप धन्यवाद!”
हेही वाचा : दिवाळीच्या पाडव्याला प्रिया बापट उमेशकडून काय गिफ्ट घेणार? अभिनेत्री म्हणाली, “माझ्या नवऱ्याने…”
दरम्यान, सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या दोघीही सध्या मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. या दोघीही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे प्रियाने लाडक्या मैत्रिणीला नव्या घरासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.