Siddharth Bodke Talks About Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. अशातच आता त्याने महेश मांजरेकर यांनी त्याला ही भूमिका ऑफर केल्यानंतर काय म्हटलेलं याबद्दल सांगितलं आहे.
सिद्धार्थ बोडके मराठीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने नाटक, मालिका, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांत काम केलं आहे. परंतु, पहिल्यांदाच तो चित्रपटातून मुख्य भूमिकेतून दिसणार आहे आणि ही भूमिकासुद्धा खूप खास आहे, कारण सिद्धार्थ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून दिसणार आहे. अशातच आता त्याने या भूमिकेसाठी काय तयारी केली याबद्दल सांगितलंय.
सिद्धार्थ बोडकेची प्रतिक्रिया
सिद्धार्थ बोडके ‘अल्ट्रा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “प्रत्येक नटाचं स्वप्न असतं की त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळावी. तसंच महेश सरांबरोबरही काम करण्याची अनेकांची इच्छा असते. मला अचानक महेश सरांचा फोन आला, त्याआधी मी त्यांना कधीही भेटलो नव्हतो. त्यांनी माझं आधीचं काहीतरी काम बघून मला फोन केला आणि सांगितलं की, ही भूमिका तू करायचीस, पण त्यासाठी खूप तयारी करावी लागणार आहे आणि त्यावेळी मी एका भूमिकेसाठी जाड झालेलो. तर ते म्हणाले की तुला बारीक व्हावं लागेल, बॉडी बनवावी लागेल. तुला घोडेस्वारी शिकावी लागेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या चित्रपटातले जे महाराज आहेत, ते प्रचंड चिडलेले महाराज आहेत.”
सिद्धार्थ पुढे याबद्दल म्हणाला, “हे माझ्यासाठी एक वेगळं आव्हान होतं की शारीरीकदृष्ट्या मेहनत घ्यावी लागणार होती आणि एका वेगळ्या पद्धतीने महाराज साकारायचे होते. खूप मोठी संधी आली होती, त्यामुळे मी जास्तीत जास्त मेहनत घेतली आणि या संधीसाठी मी कृतज्ञ आहे.” सिद्धार्थ पुढे म्हणाला, “या चित्रपटात खूप अॅक्शन आहे, तेही मी याआधी केलं नव्हतं. साधारण २० दिवस त्याची तालीम केली आणि फिजीकल ट्रान्सफॉर्मेशनला तीन महिने लागतात, ते तीन महिने तयारी केली. घोडा शिकायचा होता. मी जवळपास १५ दिवस घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेत होतो, पण शेवटच्या दिवसापर्यंत मला आत्मविश्वास येत नव्हता. पण, मी महाराजांच्या वेषात तयार होऊन सेटवर गेल्यावर माझ्यात आत्मविश्वास जागृत झाला.
सिद्धार्थ अनुभव सांगत म्हणाला, “ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्टी होती. मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि दडपण असायचं का तर मला दडपण यायचं की तितक्या ताकदीने आपण हे करू शकतो का. पण, तितकीच उत्सुकताही होती आणि महेश सरांबरोबर काम करताना छान वाटलं. ते कलाकाराला खूप सांभाळून घेतात, माझा खूप सुंदर अनुभव आहे.”
