Pushkar Jog Reveals Reason Of Depression: पुष्कर जोग काही दिवसांपूर्वी ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे प्रमुख भूमिकेत दिसली होती. अभिनेता अनेकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो.

पुष्कर जोग काय म्हणाला?

पुष्कर जोग सोशल मीडियावर मुलाखतींमध्ये अनेक बाबींवर त्याचे मत स्पष्टपणे मांडताना दिसतो. आता नुकत्याच एका मुलाखतीत महिनाभर तो नैराश्यात होता, असे वक्तव्य त्याने केले आहे. पुष्कर जोगने नुकतीच ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने तो नैराश्यात गेला असल्याचा खुलासा केला. तसेच त्याचे कारणही सांगिते. अभिनेता म्हणाला, “मी गेला महिनाभर नैराश्यात होतो. कारण- माझ्या मनात जे आहे, ते मी बोलतो. ते मला बोलावंसं वाटतं. मी मुळात फिल्मी नाहीये. मला खोटं बोलता येत नाही.”

“मी नैराश्यात होतो. कारण- मराठी चित्रपट चालत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. जर लोक म्हणत असतील दुसरा आठवडा, तिसरा आठवडा असे चित्रपट चालत आहेत, अमुक इतकं कलेक्शन झालं आहे. तर सगळे खोटं बोलत आहेत. कलेक्शन किती होतं, हे मला माहीत आहे. सगळीकडचे पैसे कट होऊन निर्मात्याच्या अकाउंटमध्ये किती जातात, हेही मला माहीत आहे. मला असं म्हणायचं आहे की, सगळे आपण एका भ्रमात आहोत. तो भ्रमाचा भोपळा आता काही वर्षांत फुटणार आहे.”

“प्रत्येक आठवड्याला दोन-दोन मराठी चित्रपट येत आहेत. कोणाचंच कलेक्शन होत नाही. निर्माता किती नुकसान करून घेणार? सप्टेंबर २०२४ ते आतापर्यंत सॅटेलाइट विकत घेणं बंद आहे. जवळजवळ ८० चित्रपटांचं सॅटेलाइट विकलं गेलेलं नाही. ओटीटीमध्ये जर जास्त लोकांनी पाहिलं, तर निर्मात्याला १० लाख रुपये मिळतात. चित्रपट अडीच-तीन कोटींचा असतो. १० लाख रुपयांनी त्याचं काय होणार आहे. तिथे नुकसान आहे. म्युझिकला जास्त पैसे मिळत नाही. चित्रपटगृहांमधून जास्त पैसे मिळालेले नसतात.”

“तुम्हाला जेव्हा वाटतं की, आता महाराष्ट्राची सबसिडी मिळणार आहे, त्यावेळी सरकार बदलतं. तर, मग आम्ही नुकसानभरपाई कुठून करायची? मराठी प्रेक्षक म्हणतात की, तुम्ही त्या दर्जाचे चित्रपट करत नाही; पण दर्जा आणणार कुठून? आम्ही पैसे लावतो. मराठी माणूस मराठी चित्रपट पाहतो का?”, असे म्हणत अभिनेत्याने मराठी चित्रपटाला प्रेक्षक नसल्याची खंत व्यक्त केली.