Pushkar Shrotri Revealed rules which father told him about drinking: अभिनेता पुष्कर श्रोत्री हा ‘सखी’, ‘वादळवाट’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘डबल सीट’, ‘एक डाव धोबी पछाड’, ‘आजचा दिवस माझा’, ‘उबुंटू’, अशा मालिका आणि चित्रपटांसाठी ओळखला जातो.

आता पुष्कर श्रोत्रीने केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. अभिनेत्याने नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने विविध विषयांवर गप्पा मारल्या. याच मुलाखतीत त्याने त्याच्या वडिलांनी दारू पिण्याचे कोणते नियम सांगितले होते, यावर वक्तव्य केले.

“सगळ्या गोष्टींची नीट कल्पना…”

पालक आणि मुलांमधील संबंध, पालकांनी मुलांना काय शिकवलं पाहिजे, याबद्दल पुष्कर श्रोत्री म्हणाला, “पालकांकडून मुला-मुलींना शेजारी बसवून सर्व प्रकारचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आपण म्हणतो ना की जेव्हा वडिलांचा शर्ट मुलाला येतो, तेव्हा तो त्याचा मित्र होतो. जेव्हा वडिलांच्या चपलेत मुलाचा पाय गेला, म्हणजे तो मोठा झाला. यापेक्षा जग आता पुढे गेलेलं आहे. तर मुलाला शेजारी बसवा, त्याला सगळ्या गोष्टींची नीट कल्पना द्या.”

“पौगंडावस्थेत मुलांना सगळ्या गोष्टींची नीट कल्पना द्या की अमुक ही गोष्ट केलीस तर त्याचा परिणाम काय असणार आहे. याचा तोटा होऊ शकतो. हे असं करू नये, हे असं करावं, हे मुलांना शिकवलं गेलंच पाहिजे. हे मुलीला आईकडून शिकवलं गेलंच पाहिजे.”

“या पलीकडे आई-वडिलांनी मुलांना शेजारी बसवून अगदी बाहेर कसं वागायचं, याबरोबरच जर तुम्हाला बाहेर सार्वजनिक ठिकाणी दारू प्यायची असेल तर ती कशी घ्यावी, किती घ्यावी, कोणाबरोबर घ्यावी हे सांगितलं गेलं पाहिजे.”

पुष्कर श्रोत्री म्हणाला, “माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की चार गोष्टी लक्षात ठेव, एकटा दारू प्यायला जायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दारू पिताना तू काय खातोस ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. पौष्टिक खा, उगाच काहीतरी अरबट-चरबट खाऊन शरीराची हानी करून घेऊ नकोस.”

अभिनेता पुढे म्हणाला, “तिसरी गोष्ट, तू ज्यांच्याबरोबर दारू प्यायला जात आहेस ते तुझे मित्र आहेत ना याची खात्री करू घे. चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दारू पिताना चर्चेसाठी असणारे विषय हे राजकारण, क्रिकेट किंवा ज्यामुळे वाद होतील, असे विषय घेऊ नयेत”, असे म्हणत अभिनेत्याने दारू पिण्याचे नियम सांगितले आहेत.