Mahesh Manjrekar On Raj & Uddhav Thackeray Reunion : काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंची जोरदार चर्चा सुरू आहे. राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू तीन महिन्यांपूर्वी एकत्र आले आणि त्यांच्या या भेटी वाढतच आहेत. मराठी भाषेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू जवळपास १९ वर्षांच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र दिसले. त्यानंतर मराठी माणसांनी त्यांच्या एकत्र येण्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.

मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकार मंडळींनीसुद्धा उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अशातच आता मराठी दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं.

ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याबद्दल महेश मांजरेकर म्हणाले…

झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकरांना ‘ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत,’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देत महेश मांजरेकर म्हणाले, “चांगलंच आहे. मराठी माणसाला आपलं नेतृत्व करणारं कुणीतरी आहे असं वाटू देत की… एक सक्षम विरोधी पक्ष असणं हे नेहमीच चांगलं असतं. एखाद्या राज्याचं चांगलं होण्यासाठी त्या राज्यात एखाद्या पक्षाला बहुमत असावं, असं मला वाटतं.”

यापुढे ते म्हणतात, “माझ्या राज ठाकरेबरोबरच्या पॉडकास्टनंतर हा मुद्दा जरा चर्चेत आला. तेव्हा मी राजला सांगितलं होतं की, मी तुला आधी एकही प्रश्न सांगणार नाही आणि त्या पॉडकास्टमध्ये त्याला तो प्रश्न थेटच विचारला होता. एकत्र येण्याबद्दलचा प्रश्न विचारायचा हे मी ठरवलेलंच होतं. त्यावर राजनं उत्तर दिलं. त्यामुळे तेव्हा ते काही ठरवलेलं नव्हतं. त्याचा इतका परिणाम होईल, असं मला वाटलं नव्हतं. पॉडकास्टनंतर झालेल्या चर्चांबद्दल मला माहितीही नव्हतं.”

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत राज आणि उद्धव ठाकरे हे जवळपास सहा वेळा भेटले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या मनसेच्या दीपोत्सवालादेखील उद्धव ठाकरे कुटुंबासह उपस्थित राहिले होते. या दीपोत्सवातले ठाकरे परिवाराचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याबद्दल शिवसैनिक आणि मनसैनिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.