एकेकाळी मराठी सिनेसृष्टी गाजवणारे, प्रसिद्ध खलनायक म्हणजे राजशेखर. राजशेखर यांच्या नातवाने एक सुंदर पत्र लिहिलं आहे; जे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. राजशेखर यांच्या नातवाचं नाव राज आहे. राजने राजशेखर यांच्या जयंतीनिमित्ताने हे भावुक पत्र लिहिलं आहे.

राजने आपल्या आजोबांबरोबर फोटो शेअर करून खास पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राजने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने लिहिलं आहे, “प्रिय आजोबा पत्र लिहिण्यास कारण की, साधारणपणे २०१२ मधील पुण्यातली ही गोष्ट आहे. माझी नुकतीच दहावी झाली होती. फर्ग्युसन महाविद्यालयातचं शिकण्याचा माझा हट्ट होता, त्या दृष्टीने प्रयत्न करून दाखला देखील मिळवला आणि उगवला माझ्या कॉलेजचा पहिला दिवस. पहिल्याच दिवशी वर्गात विद्यार्थी परिचय. बाकीच्या मुलांचा इंट्रो झाला, मग मी पुढे आलो. माझं नाव सांगितलं आणि माझ्याबद्दलचा परिचय दिला. तोच एका-एक माझ्या अवती-भवती लोकांचा गराडा जमला. जणू मी कोणीतरी मोठा स्टार आहे आणि या अनोळखी शहरात एका क्षणात ओळखीची अशी कैक नाती निर्माण झाली.”

“बरं आज हा किस्सा सांगायचं कारण म्हणजे, तुम्ही परलोकात राहून; मी परगावी असताना दिलेला हा मला आशीर्वाद होता. कारण तो जमलेला गराडा हा ‘राज’नंतरच्या ‘राजशेखर’मुळे होता आणि हे मान्य करण्यात मला सार्थ अभिमान आहे. त्या अनोळखी शहरात तुमच्यामुळे नाती जोडणं सोप्पं झालं आणि बाबांच्या संस्कारांमुळे ते टिकवणं मला जमलं. आजोबा तुम्ही जरा लवकरच गेलात नां…हो ठाऊक आहे मला शरीरानेचं गेला आहात…पण तरी.”

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत सावंतचा बाथरुममध्ये ‘अफगान जलेबी’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

पुढे राजने लिहिलं, “आजोबा…खूप जगायचं होत हो तुमच्याबरोबर… आयुष्यातील सर्व कांड सांगायचे होते…क्राफ्ट सुधारण्यासाठी तुम्हाला १०० प्रश्न विचारायचे होते…तुमचं सिनेमाबद्दलच म्हणणं जाणून घ्यायचं होतं…तुमच्या नजरेतून तुमचे गुरू ‘भालजी पेंढारकर’ अनुभवायचे होते. मी लिहिलेल्या कथा वाचून दाखवायच्या होत्या. तुमच्याबरोबर मैफिलीत बसून माझ्या कविता ऐकवायच्या होत्या. हो, मला ठाऊक आहे तुम्हीवरून हे सर्व काही पाहत आहात. मी कुठे अडकलो तर तुम्हीच जादूची कांडी फिरवता आणि माझ्या सर्व अडचणी दूर करता. मला सगळं-सगळं ठाऊक आहे…पण तरी..हे ‘तरी’ आहे नां तेच बोचतं खूप पण तुम्ही देखील पक्के हुशार होतात हां! ‘बाबांच्या नजरेतून’ माझ्याशी बोलता, ‘राहूल चाचुच्या देहबोलीतून’ आजूबाजूला दिसता, आणि ‘आजीच्या मिठीत मायेची उब’ बनून तुम्हीच असता…तुम्ही पण काही कमी नाही. नातवाची आठवण झाली की तुमच्या उर्जेची जाणीव या नं त्या मार्गाने मला देऊन जाताचं.”

हेही वाचा – Video:…म्हणून अंकिता वालावलकरने सूरज चव्हाणची घेतली उशीरा भेट, म्हणाली, “पॅडी दादा…”

“आजोबा…मी, बाबा, आजी आणि खास करून राहूलचाचू आम्ही सगळे तुमची आठवण काढतो. तुमच्या आठवणीत राहतो. जर-तरच्या गोष्टी होतात आणि प्रत्येकाचे त्या दृष्टीने स्वत:चे सिनेमे सुरू होतात. आमचे आमचे स्वतंत्र सिनेमे असले तरी त्या सिनेमात ‘नायक’ हा ‘राजशेखरचं’ असतोय…असो….बाकी HAPPY BIRTHDAY ‘बर्थडे पार्टनर’…लव्ह यू,” असं सुंदर पत्र राजशेखर यांचा नातू राजने लिहिलं आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम निखिल दामलेने खरेदी केली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राजने आजोबांसाठी लिहिलेलं पत्र वाचून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता अपूर्व रांजणकर म्हणाला, “मित्रा किती सुंदर लिहिलं आहेस. तुझ्या आजोबांना माझा नमस्कार.” राजच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो देखील मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. ‘गाथा नवनाथांची’, ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’, ‘ स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ अशा बऱ्याच मालिकांसाठी राजने काम केलं आहे.