‘हम आपके हैं कौन’, ‘बकेट लिस्ट’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून रेणुका शहाणेंनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. लवकरच अभिनेत्री ‘देवमाणूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

रेणुका शहाणे यांनी एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, तसेच चित्रपटातील एका सीनची गंमतही सांगितली आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाल्या आहेत, हे जाणून घेऊ…

रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी नुकतीच लोकशाही मराठी फ्रेंडलीला मुलाखत दिली. या मुलाखतीत महेश मांजरेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत रेणुका शहाणे म्हणाल्या, “सेटवर आमचं खेळीमेळीनं काम झालं. त्याच्याबरोबर काम करताना सुरुवातीपासूनच मजा आली, कारण उत्तम काम करणारा कलाकार समोर असल्यानंतर तुमचाही अभिनय उंचावतो, फुलतो.”

‘देवमाणूस’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये महेश मांजरेकर गुलाब केसात माळताना दिसत आहेत, त्या सीनचा किस्सा सांगताना रेणुका शहाणे म्हणाल्या, “तो सीन उत्फूर्तपणे घडलेला आहे. महेशने झेंडूचं फूल दिलं होतं, तर मी म्हटलं की झेंडू कसं माळणार डोक्यात? मग त्या अनुषगांने तेजसने त्यात बदल करून तो सीन शूट केला.” पती आशुतोष राणा यांनी कधी गुलाब दिलं आहे का? यावर बोलताना रेणुका शहाणे म्हणाल्या, “राणा सर मला शा‍ब्दिक गुलाब देतात. ते ज्या पद्धतीने कौतुक करतात, त्यांच्या कविता या तर माझ्यासाठी गुलाबच आहेत.”

पुढे रेणुका शहाणे यांनी त्यांच्या आयुष्यातील ‘देवमाणूस’ कोण आहे, यावर बोलताना म्हणाल्या की, माझी आजी आणि आई माझ्यासाठी देवमाणसं आहेत, कारण माझी जडणघडण, जो प्रामाणिकपणा, शिस्त, मूल्ये आहेत, ती मला त्यांच्याकडून मिळाली. मला असं वाटतं की, सत्यवादी असणं कितीही कठीण असलं तरी तोच खरा मार्ग आहे, हे सांगणारं मला माझं बालपण मिळालं, त्यामुळे माझ्या आयुष्यात ते आपसूक येतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘देवमाणूस’ हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.