Rinku Rajguru : ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर सिनेमामुळे मराठी कलाविश्वात एक नवीन चेहरा नावारुपाला आला तो म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू. तिने या सिनेमात साकारलेली आर्चीची भूमिका प्रत्येकाला भावली. ‘सैराट’च्या यशानंतर रिंकू रातोरात स्टार झाली आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘कागर’, ‘झुंड’, ‘आशा’, ‘झिम्मा २’ या सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून तिने प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
रिंकूने काही दिवसांपूर्वीच लोहगड येथील नामांकित रिसॉर्टवर रॉयल फोटोशूट केलं आहे. काळ्या रंगाचा अन् त्यावर सोनेरी किनार असलेला सुंदर लेहेंगा, गळ्यात चोकर हार, हातात बांगड्या या लूकमध्ये रिंकू एकदम रॉयल दिसत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा सुंदर लूक करून रिंकूने बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या सिनेमातील गाजलेल्या गाण्यावर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या रायचा ‘ताल’ सिनेमा १९९९ मध्ये म्हणजेच जवळपास २६ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात ऐश्वर्यासह अनिल कपूर आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘ताल’ सिनेमातील सगळीच गाणी सुपरहिट ठरली होती, अगदी आजही ही गाणी प्रत्येक सिनेप्रेमींच्या ओठावर असतात. या सिनेमातील हरिहरन आणि सुखविंदर सिंह यांनी गायलेलं “नहीं सामने ये अलग बात है…” हे गाणं सर्वत्र विशेष लोकप्रिय आहे. या गाण्यात मान्सूनची काही दृश्यं देखील टिपण्यात आली आहेत.
आता रिंकूने देखील “नहीं सामने ये अलग बात है…” या गाण्यावर सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेत्रीचे चाहते आणि मराठी कलाकार देखील भारावून गेले आहेत. रिंकूच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकरने रिंकूच्या व्हिडीओवर “फारच सुंदर” अशी कमेंट केली आहे. तर, स्वप्नील जोशीने “मॅडम…” अशी कमेंट करत पुढे लव्ह इमोजी दिला आहे. अभिनेता सुयश टिळकने हा व्हिडीओ पाहून ‘रॉयल’ अशी कमेंट केली आहे. याशिवाय किशोरी शहाणे, आदित्य सरपोतदार यांनीही रिंकूचं कौतुक केलं आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी सुद्धा या रिंकूवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अवघ्या काही तासांतच या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.