Rinku Rajguru shared a heartfelt Video: चित्रपटसृष्टीत असे काही कलाकार आहेत, ज्यांना पहिल्याच चित्रपटातून मोठे यश, लोकप्रियता मिळते. एका भूमिकेमुळे त्यांचे आयुष्य बदलते आणि त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण होतो.

२०१६ साली प्रदर्शित झालेला सैराट हा त्या चित्रपटांपैकीच एक आहे. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटातून रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले. आर्ची आणि परशा या भूमिकांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

‘सैराट’नंतर या दोन्ही कलाकारांनी विविध चित्रपटांत काम करून, त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात रिंकू राजगुरूला आशा या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करीत कृतज्ञता व्यक्त केली होती. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसह इतर कलाकारांनीही कमेंट्स करीत शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

रिंकू राजगुरूने शेअर केला व्हिडीओ

रिंकू अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ पोस्ट करीत चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती श्वानांच्या लहान पिल्लांबरोबर खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे एक नाही, तर श्वानाची अनेक पिल्ले तिच्याजवळ दिसत आहेत. ती पुढे जात असताना लहानशी पिल्लं तिच्या मागे धावत जात असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. रिंकूदेखील त्यांच्याशी खेळण्यात मग्न झाल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना तिने मोजक्या शब्दांत तिच्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत. रिंकूने लिहिले, “ते कधीच एक शब्दही बोलत नाहीत. पण, तरीही त्यांनी मला निस्सीम प्रेमाची भाषा शिकविली आहे. रिंकूचा हा व्हिडीओ आणि तिने लिहिलेली कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे.

रिंकूने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.

रिंकूच्या कामाबाबत बोलायचे, तर ती लवकरच ‘बेटर हाफची लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे व प्रार्थना बेहेरेदेखील प्रमुख भूमिकांत आहेत. आता तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २२ ऑगस्ट २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.