Riteish Deshmukh Praises Prasad Oak : गेल्या काही वर्षांत प्रसाद ओक कधी अभिनय, तर कधी दिग्दर्शनाच्या माध्यमातून अनेक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांतून त्याने आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याच्या ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’, ‘धर्मवीर’सारख्या अनेक सिनेमांना प्रेक्षकांकडून उत्तम दाद मिळाली.
अशातच आता प्रसाद त्याचा आगामी सिनेमा घेऊन येत आहे, ज्याचं नाव आहे ‘वडापाव’. विशेष म्हणजे, हा सिनेमा प्रसाद ओकच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट आहे. या सिनेमानिमित्त प्रसाद दिग्दर्शक आणि अभिनेते अशा दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी रितेश देशमुखने खास हजेरी लावली होती.
यावेळी रितेशने प्रसादचं कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या. तसंच टीमचंही कौतुक केलं. रितेश म्हणाला, “प्रसाद ओक ‘वडापाव’ हा तुमचा हा शंभरावा सिनेमा आहे. तुम्ही बहुतेक वर्षाला दहा सिनेमे केले असावेत. या शंभराव्या सिनेमासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं नाव, तुमचं काम हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. मीसुद्धा तुमचा खूप मोठा चाहता आहे. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून तुम्ही खूप उत्कृष्ट आहात.”
यापुढे रितेश ‘वडापाव’ सिनेमाच्या ट्रेलरचं कौतुक करत म्हणाला, “ट्रेलर पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं. कुठे वडापाव मिळतोय असं झालं आहे. दादर आणि कीर्ती कॉलेज परिसरातील इतके वडापाव खाल्ले आहेत की, आता इकडे जाऊ की तिकडे जाऊ असं झालं आहे. संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.”
यानंतर रितेश म्हणतो, “बऱ्याचदा आपण म्हणतो आणि हे सत्यही आहे की, आपल्याकडे बजेट्स नसतात. काटकसर करून काम करावं लागतं. हिंदी इंडस्ट्रीत सुविधा असतात, पण मराठीत तसं नसतानाही इतका छान सिनेमा करता आला. त्यात दिग्दर्शकापासून ते निर्माते आणि कलाकार अशा सगळ्यांचाच सगळ्यांचा वाटा असतो. मला माहित आहे. तुम्हाला किती तास काम करावं लागत असेल… काही अडचणी असतात. पण तुम्हाला झालेली अडचण या सिनेमात दिसत नाहीय.”
यानंतर रितेशने “मराठी सिनेमांना आता चित्रपटगृहांत चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमासुद्धा ब्लॉकबस्टर व्हावा असं म्हणत शुभेच्छा दिल्या. रितेशने प्रसादच्या केलेल्या कौतुकाचा व्हिडीओ अल्ट्रा मराठी बझ या पेजद्वारे शेअर करण्यात आला आहे.
प्रसाद ओक इन्स्टाग्राम व्हिडीओ
दरम्यान, ‘वडापाव’ या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटाचे अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत.