रितेश-जिनिलीयासह संपूर्ण देशमुख कुटुंब सोशल मीडियावर कायम चर्चेत असतं. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रितेश मनोरंजन विश्वात सक्रिय आहे तर, त्याचे दोन्ही बंधू राजकारणात सक्रिय आहेत. देशमुखांचं मूळ घर लातूरला बाभळगाव येथे आहे. सणासुदीला सगळे देशमुख कुटुंबीय बाभळगावमध्ये एकत्र भेटतात. दिवाळी, गणेशोत्सव असे सगळे सण एकत्र मिळून साजरे करत असल्याचं पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसांपासून रितेशच्या आई वैशाली देशमुख यांचा एक प्रेरणादायी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वैशाली देशमुख यांनी बाभळगावच्या शेतात ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेण्यासाठी अनोखी संकल्पना राबवली आहे. त्यांनी बल्बच्या कृत्रिम प्रकाशात ड्रॅगन फ्रूटचं पीक घेतलं आहे. याचबरोबर दोन्ही नातवंडांना घेऊन त्या स्वत: शेतात पोहोचल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याबद्दल त्यांच्या सूनबाई दीपशिखा देशमुख यांनी व्हिडीओ शेअर करत सविस्तर माहिती दिली आहे.
दीपिशिखा लिहितात, “शेती करत असताना त्यात सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याचा आदरणीय आईसाहेबांचा नेहमी प्रयत्न असतो आणि याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. बाभळगाव येथील शेतीमध्ये आईंनी कृत्रिम प्रकाशाच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूटच्या उत्पादनाची नवी संकल्पना राबवली आहे. वंश व दिवीयाना यांना याविषयी माहिती मिळावी यासाठी आम्ही प्रत्यक्ष तिथे भेट दिली. वंश व दिवीयाना यांना आजीमाँ व धिरज यांनी सविस्तरपणे माहिती दिली”
दीपशिखाने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षांव केला आहे. यावर बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कमेंट करत ‘वॉव’ म्हटलं आहे. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून सर्वत्र वैशाली देशमुख यांचं कौतुक करण्यात येत आहे.
दरम्यान, दीपशिखा व धिरज देशमुख यांचा विवाहसोहळा २०१२ मध्ये थाटामाटात पार पडला होता. या दोघांच्या लग्नाला बरेच मान्यवर उपस्थित होते. दीपशिखा व धिरज यांना वंश देशमुख व दिवीयाना देशमुख अशी दोन मुलं आहेत.
