Riteish Deshmukh : जिनिलीया व रितेश देशमुख यांच्याकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रितेश-जिनिलीयाला रियान व राहिल अशी दोन मुलं आहेत. प्रत्येक सणासुदीला देशमुख कुटुंबीय एकत्र येऊन सेलिब्रेशन करतात. मात्र, यंदा देशमुखांच्या घरगुती दिवाळी सेलिब्रेशनमध्ये रितेश देशमुख गैरहजर होता.
जिनिलीयाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी दोन्ही मुलांना उटणं लावून अभ्यंगस्नान घातलं. यानंतर रियान व राहिलचं औक्षण केलं. मात्र, रितेश यावेळी उपस्थित नव्हता. त्याच्या दोन्ही मुलांनी यंदाच्या दिवाळीला आपल्या लाडक्या बाबाला खूप मिस केलं. रितेश सध्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हा सिनेमा पुढच्यावर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे त्यामुळे रितेश व त्याची संपूर्ण टीम या सिनेमासाठी सध्या जोमाने काम करतेय.
आपल्या बाबाला आयुष्यात खूप यश मिळावं, त्याने यापुढे असंच काम करत राहावं यासाठी त्याच्या दोन्ही मुलांनी दिवाळीनिमित्त रितेशसाठी खास पत्र लिहिलं आहे.
अभिनेत्याचा मोठा मुलगा रियान लिहितो, “हाय बाबा…दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! तू सेटवर छान शूटिंग पूर्ण कर. पण, आम्ही तुला यंदाच्या दिवाळी लंचला खूप मिस केलं. मला माहितीये सध्या तू तुझ्या सगळ्यात आवडीचं काम करतो आहेस आणि आपल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाला भरपूर यश मिळो! खूप प्रेम”
तर, अभिनेत्याचा धाकटा मुलगा राहिल म्हणतो, “हाय बाबा…गेल्या काही दिवसांपासून तू प्रचंड मेहनत घेत असल्याचं मी पाहतोय. तुझ्याशिवाय दिवाळी लंचला फार मजा आली नाही…तुला खूप मिस केलं. पण, तू छानपैकी शूट पूर्ण कर!”
रितेश देशमुखने रियान व राहिलने लिहिलेली पत्रं सोशल मीडियावर शेअर केली आहेत. अभिनेता म्हणतो, “दिवाळीला तुमच्या मुलांकडून तुम्हाला ही पत्रं मिळणं यापेक्षा मोठं सुख काय असेल? और जिने के लिए क्या चाहिए? सध्या मी ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग करतोय आणि हा सिनेमा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि तेवढीच महत्त्वाची माझ्या मुलांनी लिहिलेली ही सुंदर पत्रं आहेत.”

दरम्यान, जिनिलीया देशमुखने सुद्धा इनस्टाग्राम स्टोरी शेअर करत दोन्ही मुलांचं कौतुक केलं आहे. रितेश-जिनिलीयाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘राजा शिवाजी’ सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजेच १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी असून हा सिनेमा ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.