अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. आजवर तिने अनेक चित्रपट, वेब सीरिजमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. तर नुकताच सईचा ‘गुलकंद’ हा चित्रपट आज १ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. ‘गुलकंद’ हा चित्रपट दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी दिग्दर्शित केला असून, त्यामध्ये सई ताम्हणकर व समीर चौघुले मुख्य भूमिकांत आहेत.

अशातच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सई अनेक मुलाखती देताना दिसली. यावेळी तिने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या ड्रीम डेटबद्दल सांगितलं आहे. मुलाखतीमध्ये चित्रपटातील कलाकारांना ‘तुमच्यासाठी डेटची व्याख्या काय आहे’, असा प्रश्न विचारला गेला होता. त्यावर प्रसाद ओक, समीर चौघुले, ईशा डे यांनी त्यांची मतं मांडली; परंतु यावेळी सईनं दिलेल्या उत्तरानं मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं. सईनं यावर म्हटलं, “मला असं खूप आवडेल की, मी जिथे आहे तिथे एक बॉक्स आलाय, ज्यामध्ये एक खूप सुंदर ड्रेस असेल आणि त्यात लिहिलं असेल की, मी ८ वाजता तुला नेण्यासाठी येईन. तू तयार राहा. पण, कुठे जायचं आहे हे मला माहीत नसेल. अशा डेटवर जायला मला खूप आवडेल.”

सईचं हे उत्तर ऐकल्यानंतर समीर चौघुले तिला गमतीत “तुला माहीत आहे का हे ऐकल्यावर केवढे बॉक्स येतील तुला” असं म्हणताना दिसले. तर ‘गुलकंद’ या चित्रपटातून सई ताम्हणकर व समीर चौघुले पहिल्यांदाच एकत्र मुख्य भूमिकांत काम करताना दिसत आहेत. या चित्रपटात सई, समीरसह प्रसाद ओक, ईशा डे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कलाकारांसह निर्मातेही चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसले. तर आजच म्हणजे १ मे महाराष्ट्र दिनी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

दरम्यान, सईच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती मराठीसह हिंदीतही बऱ्यापैकी सक्रिय असते. मराठी-हिंदी अशा दोन्ही भाषांतील वेब सीरिज, चित्रपटांमध्येही तिनं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे सध्या सई आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे; तर नुकतीच सई ‘श्रीदेवी प्रसन्न’, ‘मानवत मर्डर्स’, ‘डब्बा कार्टेल’,’देवमाणूस’, यांसारख्या वेब सीरिज व चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकांत झळकली होती