आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये रुसवे-फुगवे असणं ही गोष्ट बॉलीवूडसाठी नवीन नाही. मात्र, मराठी कलाविश्वात अशाप्रकारच्या कॅट फाइट्स तुलनेने कमी पाहायला मिळतात. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक आघाडीच्या अभिनेत्री एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. परंतु, काही अभिनेत्री पडद्यावर किंवा सोशल मीडियावर एकत्र दिसत नसल्याने अनेकांचा त्यांच्यामध्ये मतभेद आहेत असा गैरसमज होतो. त्यापैकी एक म्हणजे सई ताम्हणकर व अमृता खानविलकर.

सई व अमृता या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्या दोघीही त्यांचे चित्रपट आणि हटके स्टाइलमुळे कायम चर्चेत असतात. अनेकदा या दोघींमध्ये फारशी मैत्री नाही असं बोललं जातं. या दोघींचं नातं नेमकं कसं आहे? याबद्दल सईने नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा : अलीकडेच सरकार दरबारी कौतुक झालेल्या ‘या’ मराठी अभिनेत्याची ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात वर्णी, म्हणाला, “ज्या लोकांना…”

सई आणि सोनाली कुलकर्णीचे अनेक फोटो सोशल मीडियावर दिसतात पण, तेवढे फोटो ती अमृताबरोबर फोटो शेअर करत नाही. याबद्दल सांगताना सई म्हणाली, “प्रत्येकासाठी मैत्रीची व्याख्या ही वेगळी असते. याशिवाय प्रत्येकाच्या मैत्रीचं स्वरुप देखील वेगळं असतं. आमची मैत्री देखील वेगळी आहे. जरी आम्ही फार फोटो काढत नसलो तरीही इन्स्टाग्रामवर मी आणि अमू सगळ्यात जास्त बोलतो…या गोष्टी फारशा कोणाला माहिती नाहीत. त्यामुळे मी असंच म्हणेन की, प्रत्येकासाठी मैत्रीचे वेगवेगळे कप्पे असतात. आमच्या दोघींच्या मैत्रीचा कप्पाही वेगळा आहे. आम्ही एकत्र फोटो टाकत नाहीत. याचा अर्थ आमच्यात मैत्री नाही असा अजिबात होत नाही.”

हेही वाचा : संभाजीराजे छत्रपती यांची नवी इनिंग! सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाच्या चित्रपटात साकारणार भूमिका, खुलासा करत म्हणाले…

यापूर्वी अमृता खानविलकरला ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात सईबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, अवधूत गुप्तेने “तुमच्यात काही भांडण वगैरे झालं होतं का?” असा प्रश्न अमृताला विचारला. त्यावर अमृताने “नाही नाही, अजिबात नाही. आता आपण एका सिनेसृष्टीत काम करतो, पण म्हणून आपण अगदीच सगळीकडे गळ्यात गळे घालून फिरतो, असं नाही”, असं म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोघींच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, सई ताम्हणकरचा बहुचर्चित ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये तिच्यासह अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिकेत झळकला आहे. तसेच अभिनेत्री अमृता खानविलकर येत्या काळात ‘कलावती’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.