Sairat Fame Tanaji Galgunde Cooking Video : मराठी मनोरंजन विश्वातील मैलाचा दगड ठरलेल्या ‘सैराट’ या चित्रपटाने मराठीसह बॉलीवूडलाही वेड लावले. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाचे मराठीच नव्हे तर हिंदी प्रेक्षकांवरील गारुड अजूनही कायम आहे. २०१६ साली आलेल्या या सिनेमाला दहा वर्ष पूर्ण व्हायला आली आहेत, पण तरी या सिनेमाची आणि सिनेमातील कलाकारांची जादू काही कमी झालेली नाही.
‘सैराट’ चित्रपटातील आर्ची-परशा यांच्यासह सल्या-बाळ्या व इतर काही कलाकारदेखील चांगलेच लोकप्रिय झाले. असाच या चित्रपटातला ‘लगंड्या’ म्हणून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे तानाजी गालगुंडे. ‘परशा आर्ची आली रे आली’ असं म्हणणाऱ्या तानाजी गालगुंडेने ‘सैराट’नंतर अनेक चित्रपटांत छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा तानाजी शेतीकामही उत्तम करतो.
तानाजी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तानाजी त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतो. यापैकी काही पोस्टमधून तानाजीच्या गावची खास झलकही पाहायला मिळते. इतकंच नव्हे, तर तानाजीचं स्वत:चं यूट्यूब चॅनेलसुद्धा आहे, ज्यामार्फत तो त्याच्या शेतातले काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर करीत असतो. अशातच तानाजीनं शेतात घोसावळ्याची भाजी केली असून या भाजीची खास रेसिपीसुद्धा त्यानं शेअर केली आहे.
तानाजीनं शेतातच हे घोसावळे स्वच्छ धुतले. त्यानंतर त्यानं शेंगदाणे, मिरची आणि खोबऱ्याच्या सारणानं या घोसावळ्यांचं कालवण केलं. त्यानं स्वत:च्या शेतातच दगडांची चूल बनवून घोसावळ्याची भाजी केली आहे. यानंतर तानाजीनं शेताच्या किनारी बांधावर झाडाखाली बसून निवांतपणे या घोसावळ्याच्या भाजीचा आस्वाद घेतला. दरम्यान, तानाजीचा हा साधेपणा अनेकांना भावला आहे. तानाजीनं केलेल्या या भाजीचं अनेकांनी कौतुक केलं आहे. तसंच काहींनी आम्हीसुद्धा हा पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करू, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
तानाजी गालगुंडे इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, तानाजीच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, त्यानं ‘सैराट’नंतर ‘गस्त’, ‘झुंड’, ‘फ्री हिट दणका’, ‘एकदम कडक’ या चित्रपटांत काम केले. तसंच तो ‘घर बंदूक बिरयानी’ व ‘नवरदेव बी.एस.सी.अॅग्री’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत झळकला होता. यानंतर आता तानाजी आणखी कोणत्या नवीन भूमिकेतून किंवा नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची त्याचे चाहते वाट पाहत आहेत.
