मनोज जरांगे पाटील गेल्या शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसले होते. राज्य सरकारच्या वतीने जरांगे यांच्याशी चर्चेची एकच फेरी पार पडली होती. जरांगे यांचे उपोषण आणि मुंबईत झालेला गोंधळ यावरून उच्च न्यायालयाने फटकारले होते. शेवटी सरकारच्या वतीने जरांगे यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या, त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. यावर शरद पोंक्षे यांनी पोस्ट केली आहे.

मंत्रिमंडळाच्या मराठाविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सदस्य शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे उदय सामंत यांनी उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली मागण्या मान्य केल्या, त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. ‘आजचा दिवस सोन्याचा आहे’ आणि ‘जिंकलो रे राजा हो आपुन’ अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यावर शरद पोंक्षे अभिनंदनाची पोस्ट केली आहे.

शरद पोंक्षे यांनी फेसबूकवर फक्त तीन शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘मराठा समाजाचं अभिनंदन’ असं शरद पोंक्षे यांनी लिहिलं आहे.

शरद पोंक्षे यांची पोस्ट

sharad ponkshe maratha aarkshan
शरद पोंक्षे यांची पोस्ट (फोटो- फेसबुक)

सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या?

हैद्राबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी, आतापर्यंत शोधलेल्या ५८ लाख नोंदी- अभिलेख सर्व ग्रामपंचायतीच्या फलकावर प्रसिद्ध करणे, मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत व नोकरी देण्याबाबतची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतची उर्वरित प्रक्रिया सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार, अशी ग्वाही राज्य सरकारने दिल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले.

ओबीसींचा विरोध लक्षात घेता आणि कायदेशीर मुद्द्यांवरही ओबीसी कोट्यातून आरक्षणाची केलेली मागणी मान्य करणे सरकारला शक्य नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी मागितला आहे. तो पूर्ण होईपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होईल आणि सरकारला काही महिने निर्णय घेता येणार नाही.