Mrinal Kulkarni Birthday Post : मराठी कलाविश्वाच्या ‘सोनपरी’ म्हणून मृणाल कुलकर्णींना ओळखलं जातं. गेली अनेक दशकं त्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘स्वामी’, ‘अवंतिका’, ‘सोनपरी’, ‘गुंतता हृदय हे’, ‘राजा शिवछत्रपती’ या त्यांच्या मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजल्या. याशिवाय अभिनेत्रीने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा उमटवला आहे. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे.
आज ( २१ जून ) वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णींवर मनोरंजन सृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. यासह त्यांची सून लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळेने देखील सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
मृणाल कुलकर्णींचा मुलगा विराजस आणि शिवानी रांगोळे यांचा लग्नसोहळा मे २०२२ मध्ये पार पडला होता. या दोघांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील बऱ्याच सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. मृणाल कुलकर्णी शिवानीला आधीपासूनच ओळखत होत्या. या दोघींनी एका प्रोजेक्टदरम्यान एकत्र काम देखील केलेलं होतं. त्यामुळे शिवानी पहिल्यापासून मृणाल कुलकर्णींना ‘ताई’ अशी हाक मारते.
सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त शिवानी रांगोळे पोस्ट शेअर करत म्हणते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई…तुझ्यामुळे आज आमचं आयुष्य एवढं सुंदर आहे. तू अशीच आनंदी राहा, निरोगी राहा आणि कायम तुला हवं तसं आयुष्य जग…तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत, तुला हवं आहे ते सर्वकाही मिळो..आम्ही तुझं नेहमीच कौतुक करत राहू.”
लग्नाआधी अनेक वर्षे शिवानी आणि विराजस यांची खूप चांगली मैत्री असल्याने सासरच्या घरी अभिनेत्रीचं सर्वांशी एक सुंदर बॉण्डिंग तयार झालं होतं. शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची अत्यंत लाडकी आहे. त्या आपल्या सुनेचा मुलीप्रमाणे सांभाळ करतात. या दोघींच्या बॉण्डिंगची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली असते.
दरम्यान, मृणाल कुलकर्णींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर त्या नुकत्याच ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या सिनेमात झळकल्या होत्या. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तर, शिवानी रांगोळेच्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपल्यावर शिवानी पती विराजससह अमेरिका फिरायला गेली होती.