अभिनेत्री सखी गोखले ही दिवंगत अभिनेते मोहन गोखले व शुभांगी गोखले यांची लेक आहे, हे सर्वश्रुत आहे. सखीने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून घराघरात पोहोचली सखी आता सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
काही दिवसांपूर्वी ‘मदर्स डे’ निमित्ताने सखी व शुभांगी गोखले यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी शुभांगी यांनी सखी व मोहन गोखलेंमधील सारखे गुण सांगितले.
हेही वाचा –Video: ‘नवा गडी नवं राज्य’च्या यशानंतर श्रुती मराठेची येतेय नवीन मालिका, कधीपासून, कुठे? जाणून घ्या…
शुभांगी गोखले म्हणाल्या, “वर्षानुवर्षे लोकांनी मला म्हटलं, हिने मोहनचं काहीच कसं घेतलं नाही? रंग, रुप काहीच नाही. डोळे तरी त्याच्यासारखे असायला पाहिजे होते. अजूनही हे लोकांच्या मनामध्ये असू शकतं. मोहनसारखी ती दिसत नाही. अगदी चार-पाच माणसं आहेत जी म्हणतात ही सेम-टू-सेम मोहन गोखलें सारखीच आहे आणि ती खरंच मोहन सारखीच आहे. काहीच फरक नाहीये. म्हणजे वाचनाची आवड चांगली असणं किंवा मित्र-मैत्री जपणं. मला ती आवड आहेच. पण तो एखाद्या मित्र-मैत्रीणीवर आतड्यातून प्रेम करायचा आणि राखून ठेवायचा. कोणाचंही मनापासून स्वागत करायचा. मोहन असा कधी हॉलमध्ये बसून मोठ्याने बोलायचा नाही. चालत त्या व्यक्ती समोर जाऊन बोलायचा. कोणी मोठं असेल तर खाली बसणार आणि त्यांना खुर्चीवर बसवणार. अशा अनेक छोट्याछोट्या गोष्टी आहेत. तो खूप नम्र आणि छान व्यक्ती होता. या सगळ्या गोष्टी सखीमध्ये आहेत. मला कधी तिला गोष्टी शिकवाव्या लागल्या नाहीयेत. सखीमध्ये सामाजिक कौशल्य खूप छान होते. म्हणजे लहान होती तेव्हा तिला कोणी टपली मारून गेलं तरी ती छान हसून हॅलो असं म्हणायची. नाहीतर हा कोण माणूस आहे, मला कसं मारलं अशी छोटी मुलं करतात ना, तसं तिच नव्हतं. सगळ्याचं स्वागत करायची. हा मोहनचा गुण होता. सगळ्या गोष्टीचं स्वागत करणं.”
हेही वाचा – ‘हीरामंडी’चा दुसरा सीझन येणार की नाही? संजय लीला भन्साळींच्या ‘या’ वक्तव्यातून झाला खुलासा, म्हणाले…
पुढे शुभांगी गोखले म्हणाल्या, “काही वर्ष सखी मोहनसारखी पसारेबहाद्दर होती. तो एका ठिकाणी बसला की सगळ्या गोष्टी आजूबाजूला असायच्या. पेपर, चहाचा कप, पेन, पुस्तक सगळं बाजूला आणि कोण जात असेल तर सांगणं जरा पंखा लाव, पंखा बंद कर, हे त्याच खूप होतं. हा गुण सखीमध्ये काही वर्ष होता. दरवेळेला मी तिच कपाट आवरायची आणि मी फोटो काढून पाठवायची हे शेवटचं आहे. तुझ्यासाठी मी कधी पुन्हा हे करणार नाही. पण आता तिच्याकडे गेलं तर एकदम छान असतं. रोजच्या जगण्यातले गुण थोडे तिने माझ्यातले घेतले आहेत.”