अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) हा काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटातून अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ जानेवारी २०२४ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनाच्या निमित्ताने सिनेमातील कलाकार विविध मुलाखती देताना दिसत आहे. अनेक मुलाखतींमध्ये हे कलाकार अनेकविध विषयांवर बोलताना दिसतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते चाहत्यांच्या भेटीला येतात. आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर एक कविता सादर केली आहे.

काय म्हणाला सिद्धार्थ चांदेकर?

सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने एक कविता सादर कलेली आहे. ही कविता अशी, “गंमत बघा ना, जे लांब आहेत, त्यांना जवळ यायचंय. जे जवळ असतात, त्यांना लांब जायचंय. खूप काही बोलून बसलो म्हणून काही लोक भीत आहेत, थोडं तरी बोलायला हवं होतं म्हणून काही लोक पस्तावताहेत. इन्स्टा स्टोरी बघायला तयार आहेत; पण, खरी स्टोरी ऐकायला तयार नाहीत. मीच का घ्यायचा पुढाकार, हा प्रश्न काहींना, तर का घेतली मी माघार हा प्रश्न काहींना. आठवणींची जागा अहंकारानं कधी घेतली? जिथे ओलावा होता, तिथे ठिणगी कधी पेटली? मान्य, काही विस्कटलेल्या गोष्टी पुन्हा आवरता येत नाहीत. पण, एकदा ठेच लागली म्हणून काय परत सावरता येत नाही? लपवलेला तुकडा लावून बघा, कोडं आपोआप सुटेल, रक्ताचं नातं ना, असं कसं तुटेल?”, या कवितेच्या शेवटी फसक्लास दाभाडे या चित्रपटाचे पोस्टर पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना, सिद्धार्थ चांदेकरने, “असं कसं तुटेल? कविता कशी वाटली सांगा. आणि ज्यांच्याशी बोलायचं राहिलं आहे, त्यांना पाठवा!”, अशी कॅप्शन दिली आहे.

सिद्धार्थच्या या व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळींनी कमेंट्स करत अभिनेत्याचे कौतुक केले आहे. अमेय वाघने, “वाह भावड्या, या रक्ताच्या नात्यांसाठीच केला आहे अट्टहास”, असे म्हटले आहे. हेमंत ढोमेने, “कधीच नाही तुटणार”, अशी कमेंट केली आहे. वैदेही परशुरामीने, वाह अशी कमेंट केली आहे. याबरोबरच, किरण गायकवाड, आदिनाथ कोठारे, अभिजीत खांडेकर, जितेंद्र जोशी, अनघा अतुल, क्षिती जोग, अभिज्ञा भावे यांनीदेखील कमेंट्स केल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: “२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, फसक्लास दाभाडे या चित्रपटाची कथा ही तीन भावंडांवर आधारित असल्याचे समोर आलेल्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले आहे. चित्रपटातील डायलॉग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.