Mahesh Manjrekar & Siddharth Jadhav : महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा ३१ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवची सुद्धा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सिद्धार्थचा जबरदस्त लूक प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच रिव्हिल करण्यात आला होता. ज्यामुळे चाहते थक्क झाले होते. सध्या सिद्धार्थच्या या सिनेमातील भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे. यानंतर अभिनेत्याने महेश मांजरेकरांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

सिद्धार्थ जाधवची पोस्ट

महेश सर, तुमच्यासाठी काय लिहावं हेच कळत नाहीये. तुम्ही केवळ एक दिग्दर्शक नाही, तर माझ्या आयुष्यातील ‘देवमाणूस’ आहात. तुमच्याबरोबर काम करताना एक ‘अभिनेता’ म्हणून सिद्ध करण्याची संधी देता. ‘दे धक्का’पासून सुरू झालेला हा प्रवास ‘लालबाग परळ’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘कुटुंब’ ते आजच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’पर्यंत… तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यामुळेच मी माझ्या कामातून वेगवेगळ्या भूमिका साकारू शकलो.

तुमच्या मार्गदर्शनामुळेच मी उस्मानखिल्लारी सारख्या एका आव्हानात्मक भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्या भूमिकेला आणि सिनेमाला आज खूप प्रेम मिळतंय. सर, तुमचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक निर्णय माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. Love you sir!!!
तुमचाच…
सिद्धार्थ जाधव

दरम्यान, आपल्या भूमिकेबद्दल सिद्धार्थ जाधव म्हणतो, ”या भूमिकेबद्दल सांगायचं तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातील माझी ही भूमिका माझ्या आजवरच्या कारकिर्दीमधली सगळ्यात वेगळी आहे. या पात्रामध्ये जी क्रूरता आहे ती त्याच्या लूकमध्ये उतरणं खूप गरजेची होती. माझ्या या लूकचं पूर्ण श्रेय महेश सरांचं आहे. त्यांनी मला माझा एक फोटो पाठवायला सांगितला आणि त्यावर काम करून माझा हा लूक तयार केला. जेव्हा हा लूक माझ्याकडे आला, तेव्हा मी स्वतःच थक्क झालो. मी असाही दिसू शकतो? असा प्रश्न मला खरंच पडला होता. अशाप्रकारची भूमिका मी यापूर्वी कधीच साकारली नाही. परंतु, माझा महेश सरांवर पूर्ण विश्वास असल्याने मी सुद्धा या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.”