अभिनेता सिद्धार्थ जाधवने त्याच्या मिश्किली स्वभावाने अनेकांची मने जिंकली. त्याने फक्त मराठीतच नव्हे, तर हिंदीतही त्याच्या कामाने तेथील प्रेक्षकांचीही पसंती मिळवली. नुकताच सिद्धार्थ ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. शिवराज वायचळ दिग्दर्शित हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला.

त्यामध्ये भरत जाधव महत्त्वाच्या भूमिकेत होते. बऱ्याच दिवसांनी सिद्धार्थ जाधव व भरत जाधव ही सुपरहिट जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र पाहायला मिळाली. भरत जाधव विनोदी भूमिकांसह गंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारतात. तर सिद्धार्थनेही आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. परंतु, सिद्धार्थ अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या खासगी आयुष्यातील घडामोडीदेखील सोशल मीडियामार्फत चाहत्यांशी शेअर करीत असतो.

अशातच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सिद्धार्थ जाधवने नुकताच त्याच्याबद्दलचा एक गमतीशीर किस्सा सांगितला आहे. सिद्धार्थने ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल बोलताना सांगितले, “शाळेत असताना परीक्षेच्या वेळी अर्थशास्त्राच्या पेपरला इतिहासाच्या विषयाचा अभ्यास करून गेला होतो. इतिहासाचा पेपर समजून, मी रात्रभर त्याच विषयाचा अभ्यास केला; पण दुसऱ्या दिवशी परीक्षेच्या हॉलवर गेलो आणि समजलं की अर्थशास्त्राचा पेपर आहे.” पुढे तो म्हणाला, “३ वाजताचा पेपर होता आणि मी ११ वाजता परीक्षेच्या हॉलवर पोहोचलो होतो. तेव्हा मग माझ्या एका मित्राला घडलेली गोष्ट सांगितली आणि त्याने मला त्याच्या घरी बोलावलं तिथे त्यानं मला अर्थशास्त्र या विषयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. फार वेळ नव्हता. त्यामुळे मी निदान नापास होणार नाही इतकाच अभ्यास केला.”

त्याबद्दल पुढे सिद्धार्थ म्हणाला, “कसाबसा ३५ मार्कांचा पेपर सोडवला आणि नंतर वेळ खूप उरला असल्यानं पेपरमध्ये प्रभुदेवाचं चित्र काढून आलो. अर्थशास्त्र या विषयामध्ये मला ३५ मार्क मिळाले होते.” सिद्धार्थच्या घरात एकूणच शैक्षणिक वातावरण असल्याचं जाणवतं. त्याचा मोठा भाऊ लवेश जाधव हा डॉक्टर आहे. त्याच्या मोठ्या भावाने त्याला आजवरच्या प्रवासात कायम साथ दिल्याचे त्याने अनेक मुलाखतींमधून सांगितले आहे.