Juilee Joglekar : अलीकडच्या काळात अनेक कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. एखाद्या कलाकाराने चांगली पोस्ट केली तरी त्याला ट्रोल केलं जातं आणि चुकीची केली तरी त्याला ट्रोल केलं जातं. यामुळे अनेक कलाकार सोशल मीडियापासून दूर राहणं पसंत करतात. पण, काही सेलिब्रिटी या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत त्यांना चांगलंच सुनावतात.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका जुईली जोगळेकरबरोबर सुद्धा असंच काहीसं घडल्याचं पाहायला मिळालं. जुईली जोगळेकर व रोहित राऊत यांचं नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नुकतंच ‘आई अंबाबाई’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात जुईलीसह अभिनेत्री मिताली मयेकर आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी नृत्य सादरीकरण केलं आहे.

या गाण्याच्या पोस्टमध्ये एका नेटकऱ्याने अपशब्द वापरून अतिशय चुकीची कमेंट केली होती. “सगळे XXX भरती झालेत गाण्यांमध्ये, देवाच्या गाण्याचा मजाक बनवून ठेवला तुम्ही XXXXX” या नेटकऱ्याने या कमेंटमध्ये शिव्याही दिल्या आहेत. त्यामुळे चिडलेल्या जुईलीने सडेतोड उत्तर देत या कमेंटचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर सुद्धा शेअर केला आहे.

जुईली जोगळेकरचं प्रत्युत्तर

“अय्य भाई! भाषा सांभाळ! तुला नाही बघायचंय तर नको बघू…स्क्रोल डाऊन कर. तुला जे काही बोलायचंय ना ते तू पर्सनली मेसेज करून पण बोलू शकतोस. इथे भक्तीने आणि श्रद्धेने काम केलंय. तुमच्यासारखे नल्ले लोक इथे आई अंबाबाईच्या गाण्यावर शिव्या घालत असतील तर ते चालणार नाही. आम्ही आमचं काम कष्ट करून आणि मजा घेऊन करतो. नाचू वाटलं तर नाचतो कारण आम्ही क्रिएट केलंय ते…आम्ही ते गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय यातही खूप कष्ट आहेत. तुम्हाला तोंडाला काहीही येईल ते बोलण्यासाठी इथे अंगण दिलेलं नाहीये. काम नसतील तर काम कर…आईचा आशीर्वाद मिळेल… तेव्हाच कलेची कदर करशील. आम्ही कलाकार आहोत…. आई सरस्वतीचा हात आहे आमच्यावर ही असली थिल्लरगिरी दुसरीकडे जाऊन कर भावा! इथे नाही…!” असं सडेतोड उत्तर जुईलीने दिलं आहे. याशिवाय रोहित राऊतने सुद्धा या नेटकऱ्याला खडेबोल सुनावले आहेत.

“आम्ही रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी कला सादर करतो. गाणं बनवणं ही कला आहे. क्रिएटिव्हीवर शिव्य मिळाव्या? का करतो मग आम्ही हे सगळं?” असा सवाल गायिकेने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये उपस्थित केला आहे.

julee
जुईलीची पोस्ट

दरम्यान, जुईली व रोहित यांनी मराठी सिनेविश्वातील अनेक गाजलेली गाणी गायली आहेत. ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या शोमुळे हे दोघंही घराघरांत लोकप्रिय झाले होते. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा विवाह सोहळा २३ जानेवारी २०२२ रोजी पार पडला होता.