Riteish Deshmukh Raja Shivaji Movie : रितेश देशमुख सध्या त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमासाठी दिवसरात्र मेहनत घेताना दिसतोय. या ऐतिहासिक सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मध्यंतरी या सिनेमाच्या सेटवरचे रितेशचे अनेक फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक सिनेमा पुढच्या वर्षी १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची अधिकृत घोषणा दिग्दर्शक-अभिनेता रितेश देशमुखकडून करण्यात आली आहे. या सिनेमात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी असे दिग्गज कलाकार झळकणार आहेत.

मराठी मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याची वर्णी सुद्धा या सिनेमात लागली आहे. या अभिनेत्याने स्वत: पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता कपिल होनराव रितेशच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकणार आहे.

कपिल ‘राजा शिवाजी’ सिनेमाबद्दल म्हणतो, “२०२४ हे वर्ष माझ्यासाठी खरंच खूप कठीण गेलं. त्यामुळेच गेल्यावर्षी बरोबर घटस्थापनेच्या दिवशी देवीआईकडे मनापासून प्रार्थना केली होती की, पुढच्या नवरात्रीपर्यंत माझ्या आयुष्यात सगळं छान होऊदेत….आणि एक खूप खास गोष्ट घडली. ज्यांना पाहून मी या इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं…अशा रितेश विलासराव देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा मी एक भाग झालो, रोहन मापुसकर आपल्या मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात मोठे कास्टिंग डायरेक्टर…त्यांनी मला या सिनेमासाठी कास्ट केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये महाराजांबरोबर बालपणापासून योगदान दिलं अशा मावळ्याची भूमिका मला या सिनेमात साकारायला मिळतेय. आज तुम्हा सर्वांबरोबर ही खास गोष्ट शेअर करतोय. तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा…ही नवरात्र आपल्या सर्वांच्या जीवनात नवचैतन्य, सुख-शांती घेऊन येवो आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत.”

कपिलने ही आनंदाची बातमी शेअर करताच मराठी कलाकारांसह अभिनेत्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. १ मे २०२६ मध्ये प्रदर्शित होणारा ‘राजा शिवाजी’ सिनेमा मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या सहा भाषांमध्ये रिलीज केला जाईल.