Riteish Deshmukh Raja Shivaji Movie : रितेश देशमुखने नुकतीच त्याच्या आगामी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा ऐतिहासिक सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मध्यंतरी शूटिंगच्या सेटवरचे रितेशचे फोटो देखील व्हायरल झाले होते.
अखेर सर्व प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली असून, महाराजांची शौर्यगाथा सांगणारा ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक सिनेमा पुढच्या वर्षी १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची अधिकृत घोषणा रितेशकडून करण्यात आली आहे. सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करून संपूर्ण जगभरात हा चित्रपट सहा भाषांमध्ये प्रदर्शित होईल असं रितेशने स्पष्ट केलं आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या सहा भाषांमध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या रिलीज डेटसह रितेशने यातील कलाकारांची नावंही जाहीर केली आहे. यामध्ये रितेशसह संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. याशिवाय मालिकाविश्वातील आणखी एका अभिनेत्याची वर्णी या चित्रपटात लागली आहे. या अभिनेत्याने स्वत: पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
‘स्टार प्रवाह’च्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता कपिल होनराव रितेशच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकणार आहे. कपिलने या मालिकेत मल्हार ही भूमिका साकारली होती. ‘राजा शिवाजी’ सिनेमाबद्दल कपिल म्हणतो, “या भव्य चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे.”

कपिल या सिनेमात नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्याप त्याने उघड झालेलं नाही. सध्या अभिनेत्याचे मित्रमंडळी तसेच टेलिव्हिजन विश्वातून कपिलवर नव्या चित्रपटासाठी कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.