मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली मतं मांडत असते. तिने सोमवारी टोलबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ शेअर करत एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली होती. त्यानंतर आता तिच्या एक्स अकाउंटची ब्लू टिक काढून टाकण्यात आली आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ही कारवाई झाल्यानंतर तेजस्विनीने यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.

कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही, असं म्हणत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. “माझ्या एक्स (ट्विटर) अकाउंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण काय तर मी आम्हा जनतेची इतकी वर्षे फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून.

“टोल कुणाच्या खिशात जातोय?” तेजस्विनी पंडितने शेअर केला फडणवीसांचा व्हिडीओ; म्हणाली, “राजसाहेब तुम्हीच…”

एक्स अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. सामान्यांचा आवाज बंद करणं हाच यांचा बहुदा एकमात्र ‘X’ फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा जय हिंद जय महाराष्ट्रसाठीचा घोष योग्यवेळी सुरूच राहील.

सत्तेत कोणी का बसेना, आम्ही जनता आहोत!
जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल,
तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदुमणारच आहे,” अशी पोस्ट तेजस्विनी पंडितने केली आहे.

दरम्यान, तेजस्विनीने ब्लू टिक गेल्यानंतर केलेल्या पोस्टवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. ‘तुमची महाराष्ट्राविषयीची असणारी तळमळता ही अफाट आहे’, ‘तुमचा एक नागरिक आणि मराठी कलाकार म्हणून अभिमान आहे,’ अशा कमेंट्स युजर्सनी केल्या आहेत.

तेजस्विनीने टोलबद्दल केलेली पोस्ट नेमकी काय?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ शेअर करत तेजस्विनी पंडित म्हणाली, “म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून!! तुमचं हे विधान कसं असू शकतं? तुम्हालाही फसवणूक झाली असे वाटत असेल तर शेअर करा!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओत “शिवसेना-भाजपाची युती असताना आम्ही जी घोषणा तेव्हा केली होती त्यानुसार आता राज्यातील सगळ्या टोलवर आम्ही चारचाकी आणि छोट्या गाड्यांना मुक्ती दिली आहे. महाराष्ट्रातील टोलवर आपण फक्त कमर्शियल-मोठ्या गाड्यांचे टोल घेतो,” असं देवेंद्र फडणवीस म्हणताना दिसत आहेत.