प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील प्रत्येक भूमिकाही चांगलीच गाजली होती. विशेष म्हणजे ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. अशा या सुपरहिट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. पण, हा चित्रपट १०० कोटींचा गल्ला पार करू शकला नाही. त्यावर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नुकत्याच एका मुलाखतीमधून खंत व्यक्त केली आहे. तसेच यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘बोल भिडू’ या यूट्युब चॅनलवरील ‘दिलखुलास गप्पा’ कार्यक्रमात प्रवीण तरडे आणि उपेंद्र लिमये सहभागी झाले होते. त्या वेळेस ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाविषयी बोलताना प्रवीण तरडे यांनी ही खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘मुळशी पॅटर्न’ पाहण्यासाठी सकाळी साडेसहाचे शो लागले होते. इतके शो हाऊसफुल होऊ लागले होते. फक्त त्या वेळेस मीडियानं जरा सहकार्य करायला पाहिजे होतं. म्हणजे सगळ्यांनीच नाही; पण खूप लोकांनी त्यावेळी सहकार्य केलं. कपिल, सागर आव्हाड यांनी मला खूप मदत केली. अमोल परचुरे, अतुल परचुरे या दोन भावांनीसुद्धा खूप मदत केली. पण काही पत्रकारांनी खोडसाळ बातम्या देऊन गुन्हेगारीचा चित्रपट असं दाखवलं.”
हेही वाचा – स्पृहा जोशीच्या बहिणीनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलंय नाव; अभिनेत्री म्हणाली, “जागतिक पातळीवर…”
“सगळ्यांनी ‘मुळशी पॅटर्न’ पाहिला. पुरस्कारही मिळाले, डोक्यावर घेऊन नाचले. पण, ज्या दिवशी चित्रपटगृहात तो खूप जोरात चालू होता, त्या वेळेस खोडसाळ पत्रकारांनी उगीचच गुन्हेगारीचा चित्रपट, असं कारण नसताना रंगवलं. शेतकऱ्यांचा एवढा मोठा चित्रपट होता. जर ‘मुळशी पॅटर्न’ला ‘ए’ सर्टिफिकेट दिलं नसतं आणि खोडसाळ पत्रकारांनी गुन्हेगारीचा चित्रपट म्हणून रंगवलं नसतं, तर ‘मुळशी पॅटर्न’ १०० कोटी क्रॉस केलेला चित्रपट असता. कारण- तळागाळातल्या समाजाचा मातीचा प्रश्न सांगणारा चित्रपट हा सुपरहिटच होतो आणि तो झालाच. खूप पैसे कमवले; पण १०० कोटींच्या क्लबमध्ये त्याची जायची ताकद होती,” असे दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले.
हेही वाचा – भारतीय जवान आहे किरण मानेंचा जबरा फॅन; अभिनेते अनुभव सांगत म्हणाले, “काळीज…”
दरम्यान, ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा हिंदी रिमेकही बनवला होता. हिंदीत या चित्रपटाचं नाव ‘अंतिम’ असं होतं. या चित्रपटात सलमान खान व आयुष शर्मा मुख्य भूमिकेत होते.