Titeeksha Tawde Emotional Video : आपल्या माणसानं आपल्या कामाचं केलेलं कौतुक हे कायमच खास असतं. कलाकारांच्या आयुष्यात असे कौतुक करणारे क्षण अनेकदा येत असतात. कलाकारांवर चाहते, प्रेक्षक कायमच प्रेम करतात. तसेच या कलाकारांवर त्यांच्या जवळच्या खास व्यक्तीचं प्रेमही तितकंच महत्त्वाचं असतं. तसेच या खास व्यक्तीनं केलेलं कौतुकही तितकंच स्पेशल असतं. असाच खास प्रसंग सिद्धार्थ बोडकेच्या आयुष्यात आला आहे.

सिद्धार्थ बोडके हा मराठी मनोरंजन विश्वातला लोकप्रिय अभिनेता आहे. नाटक, टीव्ही मालिकांमधला त्याचा हा प्रवास आता सिनेमापर्यंत येऊन पोहोचला आहे. काही हिंदी आणि मराठी सिनेमांमधून सिद्धार्थनं आपला दमदार अभिनय दाखवून दिला आहे. अशातच त्याचा नुकताच ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात सिद्धार्थनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमात शेतकरी आत्महत्या हा विषय दाखवण्यात आला आहे आणि या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी साक्षात छत्रपती शिवाजी महाराज अवतरले असल्याचं सिनेमातून पाहायला मिळत आहे. याच सिनेमातील सिद्धार्थची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका लक्षवेधी ठरत आहे. त्याच्या अभिनयाबद्दल अनेकांनी कौतुक केलं आहे.

अशातच सिद्धार्थची पत्नी व अभिनेत्री तितीक्षा तावडेला त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून अश्रू अनावर झाले. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तितीक्षा सिद्धार्थला मिठी मारून रडत आहे. तिच्या डोळ्यांमधून सतत अश्रू वाहत आहेत. सिद्धार्थचं काम पाहून ती भारावून गेली आहे.

सिद्धार्थच्या कामाचं कौतुक करीत ती मला तुझा अभिमान असल्याचं बोलताना या व्हिडीओमधून दिसत आहे. इतकंच नव्हे, तर तितीक्षाचे बाबा म्हणजेच, सिद्धार्थच्या सासऱ्यांनाही जावयाचं काम आवडलं आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थचे सासरेसुद्धा त्याचं मनापासून कौतुक करीत असल्याचं दिसत आहे.

सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडे यांचा भावुक व्हिडीओ

दरम्यान, या व्हिडीओवर सिद्धार्थ-तितीक्षाच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. नेटकऱ्यांनी दोघांचं भरभरून कौतुक केलं आहे. “आवडती जोडी”, “जोडी नंबर १”, “खूपच छान” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर व्यक्त केल्या आहेत.

सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडे मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी आहे. दोघे कायमच एकमेकांच्या कामाचं कौतुक करत आले आहेत. अशातच आता सिद्धार्थच्या कामानं तितीक्षा भारावून गेली असून त्याचं कौतुक करताना तिला अश्रू अनावर झाले.