Umesh Kamat on working with Priya Bapat in film after 12 years: प्रिया बापट व अभिनेता उमेश कामत ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. हे दोन्ही कलाकार विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नाटक, सिनेमा व चित्रपट या माध्यमांतून हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतात.

प्रिया बापट नुकतीच ‘अंधेरा’ वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या भूमिकेचे कौतुक होताना दिसत आहे. त्याबरोबरच उमेश व प्रिया जर तरची गोष्ट या नाटकात एकत्र काम करताना दिसतात. त्यांच्या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. मात्र, अनेक वर्षांपासून हे कलाकार एकत्र चित्रपटात दिसले नव्हते. १२ वर्षांपूर्वी ते टाइम प्लीज या चित्रपटात एकत्र झळकले होते.

आता १२ वर्षांनंतर हे जोडपे ‘बिन लग्नाची गोष्ट’ या मालिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात गिरीश ओक आणि निवेदिता सराफदेखील प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. आता या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला सोहळ्याला अनेक कलाकार उपस्थित होते.

प्रिया बापट व उमेश कामत काय म्हणाले?

आता ट्रेलर लाँच सोहळ्यात पुष्कर श्रोत्रीने विचारले की, तुम्हाला स्क्रीन शेअर करण्यासाठी १२ वर्षे का लागली? त्यावर प्रिया बापट म्हणाली, “कारण आमच्या दोघांसाठी योग्य असलेलं स्क्रिप्ट आणण्यासाठी आदित्यनं १२ वर्षं लावली.”

उमेश कामत पुढे म्हणाला, “खरं सांगायचं, तर १२ वर्षांपूर्वी आम्ही दोघं खूप एकत्र काम करत होतो. टेलिव्हिजन शो, नवा गडी नवं राज्य एकत्र करत होतो. त्याच्यावर टाइम प्लीज हा चित्रपट झाला. तर आम्ही ठरवलं होतं की, आता एकत्र काम नको करूयात. नाही तर असा शिक्का बसेल की, प्रियाला कास्ट केलं की उमेशला घ्यावंच लागतं, उमेशला कास्ट केलं की, प्रियाला घ्यावंच लागतं, असं लोकांना वाटू नये. म्हणून आम्ही ठरवून एकत्र काम न करण्याचा आणि स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर चार वर्षांनी वाटलं की, आता एकत्र काम करूया. कारण- लोक म्हणत होते की, तुम्ही एकत्र दिसत नाही. पण, त्यानंतर मनासारखं काही मिळत नव्हतं. छान काही येत नव्हतं.आता ही स्क्रिप्ट आली. त्यानंतर आम्ही १२ वर्षानंतर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसत आहोत.

अभिनयाबरोबरच प्रिया तिच्या गाण्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत असते. सोशल मीडियावरही हे दोन्ही कलाकार सक्रिय असतात. आता त्यांचा हा नवीन चित्रपट प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटात निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने व संजय मोने हे कलाकारही प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.