Uut Marathi Movie Screening In Cannes: सिनेविश्वातील मानाच्या समजल्या जाणार्या कान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नानाविध चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळत असते. विविध राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गाजलेल्या वेरा फिल्म्सच्या ‘ऊत’ या मराठी चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाले.
मलेशिया फिल्म फेस्टिवल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिवल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल, साइनसिने फिल्म फेस्टिवल, श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, मँचेस्टर फिल्म फेस्टिवल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यांसारख्या अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवांत ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे. त्यानंतर आता ‘कान्स’सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात ‘ऊत’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राम मलिक दिग्दर्शित या चित्रपटातून राज मिसाळ आणि आर्या सावे हे युवा कलाकार भेटीला आले आहेत.
अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना, म्हणाला…
‘कान्स’सारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवात ‘ऊत’ चित्रपटाचं स्क्रीनिंग आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणं ही आमच्या चित्रपटाच्या टीमसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे चित्रपटातील मुख्य अभिनेते राज मिसाळ यांनी सांगितले. समाजापर्यंत चांगला दृष्टिकोन पोहोचवण्याच्या केलेल्या प्रयत्नाचं हे यश आहे, अशी भावना त्यांनी या स्क्रीनिंग नंतर व्यक्त केली.
‘ऊत’ चित्रपटातून एक ज्वलंत सामाजिक विषय मांडण्यात आला आहे. लवकरच हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. आता ‘कान्स‘मध्ये या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर चित्रपटगृहांत प्रेक्षक गर्दी करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याबरोबरच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, हे पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरणार ठरणार आहे.
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. त्यामध्ये बॉलीवूडसह मराठी कलाकारांचादेखील समावेश आहे. अभिनेत्री ऐश्वर्या रायने पारंपरिक लूकमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या लूकचे चांगलेच कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. चाहत्यांसह अनेक लोकप्रिय कलाकारांनी ऐश्वर्या रायचे कौतुक केले आहे. अभिनेत्रीने लेकीसह कान्समध्ये हजेरी लावली आहे. त्याबरोबरच या वर्षी आलिया भट्टनेदेखील कान्समध्ये पदार्पण केले आहे. तिचा लूकदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, छाया कदम यांनीदेखील कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली आहे. त्यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या मालवणी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे.