Anita Padhye On Veteran actor Dada Kondkes Death Night: ‘राम राम गंगाराम’, ‘पांडू हवलदार’, ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘येऊ का घरात’, अशा अनेक चित्रपटांतून दादा कोंडके यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता अनिता पाध्ये यांनी एका मुलाखतीत दादा कोंडके यांच्याबाबत वक्तव्य केले आहे.
अनिता पाध्ये लेखिका आणि पत्रकार म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांनी दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्यावर आधारित ‘एकटा जीव’ हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक लिहिताना त्यांच्याबद्दल माहिती घेण्यासाठी त्या दादा कोंडकेंना भेट देत असत. त्यादरम्यानच्या अनेक आठवणी त्यांनी ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या. तसेच, दादा कोंडके यांच्या निधनाच्या दिवसाबद्दलही वक्तव्य केले.
अनिता पाध्ये म्हणाल्या, “दादांचं निधन अचानक झालं. रात्री पाऊणेतीन वाजता त्यांचे मॅनेजर जीतू भाई यांचा मला फोन आला. ते मला म्हणाले की दादांची प्रकृती बिघडली आहे. आम्ही त्यांना सश्रृषाच्या हॉस्पिटलमघ्ये घेऊन चाललो आहे. तर तुम्ही याल का? त्यांच्याबरोबर जे चार लोक काम करायचे, दादा त्यांच्याबरोबच राहायचे. मी त्यांना येते असं सांगितलं.”
“मी माझ्या भावाला घेऊन गेले. त्यांना कॉरिडोअरमध्ये स्ट्रेचरवर ठेवलं होतं. मी डॉक्टरांना विचारलं की काय झालं? तर त्यांनी हार्ट अटॅक आला आहे असं सांगितलं. डॉक्टरांना पंपिंग करा असं म्हणाले. डॉक्टर म्हणाले की मी करतो पण ते काही उपयोग होईल असं वाटत नाही. त्यांना जाऊन १० मिनिटं झाली आहेत. त्यांनी प्रयत्न केला पण काही झालं नाही.”
“दादांचे दोन मित्र आणि मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन गेलो”
“मी माझ्या भावाला सांगितलं की तू या लोकांबरोबर जा आणि दादांच्या नातेवाईकांना फोन कर. दादांची बहीण पुण्याला राहायची. त्यानंतर दादांना घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सची गरज होती. हॉस्पिटलच्या दारात ॲम्ब्युलन्स उभी होती. पण,तेथील लोक म्हणाले की पण फॉर्म भरावा लागेल, ते रजिस्टर लॉकरमध्ये आहे, आता ड्राइव्हर नाही. त्या काळात मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्स नव्हत्या. एक शिवसेनेची ॲम्ब्युलन्स होती. पण, ती आम्हाला मिळाली नाही.
“मी पहिला फोन विजय कोंडकेंना केला. कारण- किती काही झालं तरी आम्ही बाहेरची माणसं होतो. रक्ताचे नातेवाईक ते होते. दादांच्या शेवटच्या काळात विजय कोंडकेबरोबर त्यांचे संबंध चांगले नव्हते. पण, मी त्यांना फोन केला आणि त्यांना दादांच्या निधनाबद्दल सांगितलं. दादांचे जवळचे दोन मित्र होते, त्यांना मी फोन केला. साबीर शेख त्यावेळी कामगार मंत्री होते. त्यांनाही मी फोन केला, तर ते अंबरनाथला होते. या सगळ्यात हॉस्पिटलमध्ये दोन तास मी दादांच्या प्रेताजवळ एकटी होते.”
अनिता पाध्ये पुढे म्हणाल्या, “आम्हाला ॲम्ब्युलन्स मिळाली नाही. तेव्हा दादांची कॉन्टेसा गाडी होती. कॉन्टेसा गाडीचा मागचा भाग रुंद असतो. दादांचे दोन मित्र आणि मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन गेलो. कारण- अॅम्बुलन्स नव्हत्या. त्यावेळेला इतक्या सोयीसुविधा नव्हत्या.”
“दादा बालमोहनच्या गल्लीत एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहायचे. आम्ही दुसऱ्या मजल्यावर प्रेत घेऊन गेलो आणि संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांचे सगळे नातेवाईक, बहिणी, हिंदी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोक आले होते. त्यांचा मुलगासुद्धा नोकरीनिमित्त नाशिकला होता. ते सगळे आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. राजकीय लोक आले होते. छगन भुजबळ यांनी तेव्हा शिवसेना सोडली होती पण दादांसाठी ते तिथे आले होते. बाळासाहेब ठाकरे आले होते. ते कोणाशी बोलले नाहीत. ते दादांच्या प्रेताजवळ बसले होते. त्यांच्या कपाळावरुन हात फिरवत होते. कारण- त्यांची खूप वर्षांची मैत्री होती.
अनिता पाध्ये असेही म्हणाल्या की दादा खूप मोठे अभिनेते होते. पण, त्यांचे पाय कायम जमिनीवर होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. निर्माता, कलाकार, दिग्दर्शक, गीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली.