Dilip Prabhavalkar on working with new generation: गेल्या काही दिवसांपासून दशावतार सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. १२ सप्टेंबर २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला.
या चित्रपटाचे फक्त प्रेक्षकांनीच नाही तर अनेक कलाकारांनीदेखील कौतुक केले. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. अमोल परचुरेंच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर यांनी नवीन पिढीबरोबर काम करण्याबाबत वक्तव्य केले. दिलीप प्रभावळकर म्हणाले, “मला असं वाटतं की चित्रपट किंवा नाटक यांचा प्रवाह आपण पाहतो.
दिलीप प्रभावळकर नवीन पिढीबरोबर काम करण्याबद्दल काय म्हणाले?
“हा प्रवाह बदलत जातो. तर तो बदल काठावरुन पाहण्यापेक्षा त्या प्रवाहामध्ये मला सामील होता येत आहे. त्यामध्ये मला पोहायला मिळत आहे, हे मी स्वत:चं भाग्य समजतो. अजून मी आऊटडेटेड झालेलो नाही. नवीन पीढी सहजतेने माझ्याबरोबर काम करते.”
“नवीन पीढीतील लोक, कलाकार आहेत. आता माझ्याबरोबर सिद्धार्थ मेनन काम करतोय, प्रियदर्शिनी इंदलकर काम करतेय. लक्ष्याबरोबर मी काम केलं होतं. प्रिया बेर्डे बरोबर मी काम केलं आहे आणि आता त्यांचा मुलगा अभिनय त्याच्याबरोबरही मी काम करत आहे. नवीन कलाकार, दिग्दर्शक यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळेच जरी मी अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जाऊन घेतलं नसलं तरी अभिनयाचा हा कोर्स आजतागायत सुरू आहे. “
पुढे दिलीप प्रभावळकर म्हणाले, “नवीन काहीतरी शिकायला, बघायला, करायला मिळणं,नवीन काही प्रयोग करायला मिळतं, त्याचं समाधान मिळतं. तर ही संधी मिळणं नवीन आव्हान पेलणं आणि त्यानंतर मी हे निभावून नेऊ शकलो, हा आत्मविश्वास मिळणं हे फार महत्वाचं आहे.”
दशावतार सिनेमाने प्रदर्शित झाल्यापासून कोट्यवधींची कमाई केली आहे. संपूर्ण जगभरात या सिनेमाचे कौतुक होताना दिसत आहेत. सुबोध खानोलकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.