Deepak Shirke Shares Lakshmikant Berde Memory : प्रसिद्ध मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलंच; पण आपल्या अभिनयानं त्यांनी हिंदी इंडस्ट्रीसुद्धा गाजवली. आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक सिनेमे आवर्जून पाहिले जातात. लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या अनेक आठवणी मराठी प्रेक्षकांच्या मनात आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अनेक चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी त्यांच्या अनेक आठवणी शेअर करीत असतात. अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण शेअर केली आहे.
‘दे दणादण’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘झपाटलेला’, ‘एक गाडी बाकी अनाडी’ या आणि अशा अनेक सिनेमांत लक्ष्मीकांत बेर्डे आणि दीपक शिर्के यांनी एकत्र अभिनय केला आहे. मात्र, त्यांची मैत्री खूप जुनी. त्यांच्या याच मैत्रीचा खास किस्सा दीपक शिर्के यांनी नुकत्याच एका मुलाखतीत शेअर केला आहे.
मित्र म्हणे या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत दीपक शिर्केंनी सांगितलं, “मी आणि लक्ष्या मुंबईत मराठी साहित्य संघात असायचो. त्या परिसरात फिरायचो. तेव्हा लक्ष्याला अभिनयाचा पगार मिळायचा. आम्ही आपले उनाड होतो. तेव्हा तात्या अमोणकर, शिवाजी चिखलीकर, अरुण सरनाईक, सतीश दुभाशी, जयश्री गडकर असे अनेक दिग्गज कलाकार तिथे यायचे. अनेक दिग्गज कलाकारांना कँटीनमध्ये बघायला मिळायचं. ते कँटीन आमच्या मित्राचं होतं, यामुळे आम्हाला त्या कलाकारांना बघायला मिळायचं, यामुळे नाटकाच्या चर्चा ऐकायला मिळायच्या.”
यापुढे दीपक शिर्के सांगतात, “तेव्हा लक्ष्या नाटकात काम करत होताच, तर त्याला एका भूमिकेसाठी उंच आणि धिप्पाड व्यक्तीची गरज होती. तर त्याने पुरुषोत्तम बेर्डेला माझं नाव सांगितलं. मग मी ‘टूरटूर’ नाटकासाठी गेलो होतो, पण तेव्हा मी अभिनयात नवीनच होतो, मला अभिनयातलं काहीच येत नव्हतं; तेव्हा पुरुषोत्तम बेर्डेला माझ्याबद्दल ‘हा काय अभिनय करणार, सगळी वाट लावेल’ असं वाटत असणार, त्यामुळे तेव्हा मला नाटकातून काढायचंसुद्धा ठरवलं असणार. पण, तेव्हा लक्ष्या पुरुषोत्तम बेर्डेला म्हणाला की तो करू शकेल, जास्तीच्या तालीम घेऊन त्याच्याकडून काम करून घे. कालांतराने अनेक प्रयोग झाल्यानंतर मी त्यांच्यात रुळलो.”
दरम्यान, दीपक शिर्के यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमांतूनही त्यांनी आपला सशक्त अभिनय दाखवला आहे. रंगभूमीपासून सुरुवात करत त्यांनी कालांतराने मोठ्या पडद्यावर एक वेगळे स्थान निर्माण केले. अलीकडे ते ‘आता थांबायचं नाय’ सिनेमात झळकले होते.