Vivek Agnihotri Statement On Varan Bhat : उकडीचे मोदक, वरण-भात, पुरणपोळ्या या आपल्या मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीची जगभरात चर्चा होत असते. विदेशातील लोक भारतात आल्यावर आवर्जून मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेतात. एकीकडे महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचं जगभरातून कौतुक होत असताना दुसरीकडे बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मराठी जेवण म्हणजे गरिबांचं जेवण असं वक्तव्य केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
विवेग अग्निहोत्री सध्या त्यांच्या ‘द बंगाल फाइल्स’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. यादरम्यान, त्यांनी ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीवर भाष्य केलं. तसेच मराठी जेवणाला गरिबांचं जेवण असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे आता त्यांच्यावर सोशल मीडियावर चांगलीच टीका होताना दिसत आहे.
नेटकऱ्यांसह मराठी अभिनेत्री नेहा शितोळे, लोकप्रिय दिग्दर्शक महेश टिळेकर आणि आता अभिनेता पुष्कर जोगने देथील पोस्ट शेअर करत विवेक अग्निहोत्रींने केलेल्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
पुष्कर जोगची पोस्ट
पुष्कर जोग पोस्ट शेअर करत म्हणतो, “सगळे महाराष्ट्रात येतात छान काम करतात, पैसे कमावतात…पण मराठीला तो मान देत नाहीत, या गोष्टीचं खरंच वाईट वाटतं. यावर कोणी काहीच बोलत नाही. अजून पुढच्या १० ते १२ वर्षांत मराठी माणसाचं अस्तित्व राहील का? याची भीती वाटते. या कमेंटचा जाहीर निषेध…एवढी गरिबी आहे म्हणूनच आज अख्ख्या देशाचा भार मुंबई आणि महाराष्ट्राने उचलला आहे…असो… जोग बोलणार”

विवेक अग्निहोत्री नेमकं काय म्हणाले?
“लग्नानंतर पल्लवीने माझ्यासाठी वरण-भात बनवला होता. मी दिल्लीचा असल्याने मला बटर चिकन, कबाब, तंदुरी असे मसालेदार झणझणीत पदार्थ खायची सवय होती. तेव्हा असं वाटलं हे कसलं गरिबांचं जेवण…इकडची खाद्यसंस्कृती पाहून मला सुरुवातीला धक्का बसला होता. पण आता विचाराल तर, माझ्यामते हेच आरोग्यासाठी उत्तम जेवण आहे.” असं वक्तव्य विवेक अग्निहोत्रींनी केलं आहे.