Zapuk Zupuk box office collection day 3 : ‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट शुक्रवारी (२५ एप्रिल २०२५ रोजी) रिलीज झाला. केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांची मांदियाळी आहे. या चित्रपटाची टीझर व ट्रेलरनंतर खूप क्रेझ होती, मात्र रिलीजनंतर कलेक्शन खूपच कमी झाले आहे.
‘झापुक झुपूक’ची बॉक्स ऑफिसवर ओपनिंग फार संथ झाली होती. त्यानंतर वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत वाढ होईल, असं वाटत होतं. मात्र कलेक्शनवरून तसं दिसत नाहीये. चित्रपटाची तीन दिवसांची कमाई एक कोटींहून कमीच आहे. ‘झापुक झुपूक’चे तिन्ही दिवसांचे कलेक्शन लाखांमध्येच आहे.
‘झापुक झुपूक’चे कलेक्शन
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ ने भारतात पहिल्या दिवशी २४ लाख रुपयांचे कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी देखील ‘झापुक झुपूक’ चित्रपटाने २४ लाखांची कमाई केली होती. आता रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी ‘झापुक झुपूक’ ने किती गल्ला जमवला, त्याची आकडेवारी समोर आली आहे.
आधीच्या दोन्ही दिवसांपेक्षा तिसऱ्या दिवशी ‘झापुक झुपूक’च्या कमाईत घट झाली आहे. ‘झापुक झुपूक’ ने रविवारी फक्त १९ लाखांचे कलेक्शन केले. या चित्रपटाची तीन दिवसांची कमाई ६७ लाख रुपये आहे. ‘झापुक झुपूक’ च्या टीमने अधिकृत आकडेवारी अद्याप शेअर केलेली नाही.
केदार शिंदे यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती. चित्रपटाचं नाव ‘झापुक झुपूक’ असेल, असंही त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं. सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला, त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या ६ महिन्यांत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती. शूटिंगचे फोटो व व्हिडीओ केदार शिंदे शेअर करत असायचे. ‘झापुक झुपूक’च्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे.
झापुक झुपूक’ चित्रपटात सूरजसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहेत.