Zapuk Zupuk Dialogue Controversy: केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामध्ये ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसत आहे.
‘झापुक झुपूक’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सूरज चव्हाणला ट्रोल करण्यात आले. त्यावर केदार शिंदेंनी मत वक्तव्य केले होते. आता मात्र सूरज एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने झापुक झुपूक हा माझा डायलॉग आहे, असे म्हटले आहे.
‘झापुक झुपूक’ हा डायलॉग सूरज चव्हाणचा नाही…
सागर शिंदे ऊर्फ रावडी नेता या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने रावडी नेता असे नाव असलेल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सागर शिंदे म्हणाला, “झापुक झुपूक हा डायलॉग मला सुचलेला आहे. डीजे व साऊंड सिस्टीम या गोष्टींची मला आवड आहे. तर कुठे डीजे वाजत असेल, तर मी तो बघायला जायचो. तेव्हा मी म्हणायचो हा साऊंड झापुक झुपूक वाजतोय. लहानपणापासूनच मी हा डायलॉग म्हणत होतो.
झापुक झुपूक हा शब्द मी पहिल्यांदा २०२२ ला बोललो. २०२२ ला मी दहीहंडीचा एक व्हिडीओ केला होता. तेव्हा साउंड सिस्टीमबाबत बोलताना मी झापुक झुपूक हा डायलॉग बोललो होता. २०२२ हा व्हिडीओ चालला नव्हता. २०२३ ला मी तोच व्हिडीओ रिक्रिएट केला. त्यामध्ये मी झापुक झुपूक हा शब्द वापरला. तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला. लोकांनी झापुक झुपूक हा डायलॉग त्यावेळी डोक्यावर घेतला होता.
पुढे सागर शिंदे म्हणाला की, काही डीजेंनी माझे डायलॉग वापरायला सुरुवात केली. दिलात झापुक झुपूक वाजतंय हे गाणं ज्या व्यक्तीनं बनवलं, त्यानं मला क्रेडिट दिलं नाही. माझ्या परवानगीशिवाय त्यानं हे गाणं तयार केलं. जून २०२४ मध्ये सूरज चव्हाणने एका व्हिडीओमध्ये माझा झापुक झुपूक हा डायलॉग वापरला. तिथे मी त्याच्यावर आक्षेप घेऊ शकलो असतो. पण, जे डीजे होते, त्यांनी माझा फोटो लावला होता. त्यामुळे मला त्याचं क्रेडिट मिळत होतं. तोपर्यंत मला काहीच समस्या नव्हती. सूरजनं माझा डायलॉग त्याच्या व्हिडीओमध्ये वापरला, तेव्हासुद्धा मला काही समस्या नव्हती.
मला समस्या कुठे जाणवली तर जेव्हा सूरज बिग बॉसमध्ये आला. जेव्हा त्याची ओळख करून दिली जात होती. त्यावेळी सूरजनं झापुक झुपूक हा शब्द वापरला. तो बिग बॉसमध्ये असं सांगत होता की, मला हा डायलॉग अचानक सुचला. पण, त्याला माहीत होतं की, हा माझा डायलॉग आहे. बिग बॉसमध्ये त्यानं जवळजवळ सगळ्या एपिसोडमध्ये हा डायलॉग म्हटलेला आहे. जेव्हा बिग बॉसमध्ये पत्रकार परिषदेत घेतली तेव्हासुद्धा सूरजनं असं म्हटलं की मला हा डायलॉग अचानक सुचला. तो म्हणू शकला असता की, हा डायलॉग एका मुलाच्या व्हिडीओमध्ये बघितला होता. तो क्रेडिट देऊ शकला असता. कमीत कमी खरं तरी बोललं पाहिजे.
आता केदार शिंदेंनी झापुक झुपूक हा त्यांचा सिनेमा प्रदर्शित केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सूरजला हीरो म्हणून घेतले आहे. त्यामुळे सगळ्यांना हे वाटायला लागलंय की, हा डायलॉग सूरजनं आणला आहे, तो त्याचाच डायलॉग आहे. पण, तो डायलॉग माझा आहे. त्याची मी नोंदणी केलेली आहे.
दरम्यान, आता केदार शिंदे दिग्दर्शित झापुक झुपूक हा सिनेमा किती कमाई कऱणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या चित्रपटात मिलिंद गवळी, इंद्रनील काम, जुई भागवत हे कलाकारदेखील प्रमुख भूमिकांत आहेत.