Zapuk Zupuk Movie: केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सूरज चव्हाणची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या चित्रपटात इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. २५ एप्रिलला ‘झापुक झुपूक’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी केदार शिंदे यांनी हा चित्रपट सूरज चव्हाण बायोपिक नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘मॅजिक १०६.४ एफएम’शी संवाद साधताना केदार शिंदे म्हणाले, “एक घोळ झालाय…’बिग बॉस मराठी’मध्ये एक गोष्ट जाहीर केली की, मी सूरज चव्हाणबरोबर चित्रपट करतोय. त्याचं नाव ‘झापुक झुपूक’ आहे. सूरज चव्हाणवर चित्रपट नाही करत आहे. चित्रपटाची कथा वेगळी आहे. माझ्याकडे गोष्ट होती, ज्या गोष्टीला डिव्हाइसची गरज होती आणि ते डिव्हाइस खूप इंटरेस्टिंग असायला पाहिजे होतं. माझे असंख्य मित्र आहेत. जे चांगले अभिनेते आहेत. पण यावेळी अभिनेता नको होता. मला ते पात्र हवं होतं. मी नेहमीच कास्टिंगच्या बाबतीत खूपच तंतोतंत राहिलो आहे. पहिला चित्रपट ‘अगं बाई अरेच्चा’पासून ते शेवटचा चित्रपट ‘बाईपण भारी देवा’पर्यंत. जोपर्यंत कास्टिंग योग्य ठरतं नाही तोपर्यंत मी तो चित्रपट सुरू करत नाही.”

पुढे केदार शिंदे म्हणाले, “रितेश देशमुख यांच्याबरोबर ‘बिग बॉस मराठी’चा प्रीमियर झाला. त्यावेळी १६ स्पर्धकांना ‘बिग बॉस’च्या घरात पाठवलं. त्या रात्री मी चॅनेल रुममध्ये बसलो होतो. चॅनेल रुममध्ये कसं असतं, एक टेली असतो. त्या टेलीवर सगळे कॅमेरे दिसत असतात. तेव्हा एका कोपऱ्यात चार लोक, तर दुसऱ्या कोपऱ्यात आठ लोक असे सगळेजण होते. हा एकमेव होता रात्री दीड वाजता, जो ‘बिग बॉस’च्या वॉशरुममध्ये शिरला. ‘बिग बॉस मराठी’चं घर यावेळेस खूप वाकडं-तिकडं होतं. वॉशरुमचा दरवाजा साधारणपणे आपण ढकल्यानंतर उजव्या बाजूने उघडतो. आम्ही उजवी बाजू लॉक केली होती आणि डाव्या बाजूने तो दरवाजा उघडायचा होता. याला रात्री दीड वाजता पुढची जवळपास सात-आठ मिनिटं दरवाजा उघडेना. मी ते बघत होतो ना, मला इतकं हसू आलं की एक सर्वसामान्य मुलगा जो महाराष्ट्रातल्या कुठल्यातरी मान्यता प्राप्त गावचा आहे. त्यामुळे तो चित्रपटातल्या पात्रासाठी बरोबर आहे. तसंच पात्राचं नाव सूरजचं आहे.”

नंतर केदार शिंदे म्हणाले की, सूरजच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्याबरोबर ज्या गमती-जमती घडलेल्या आहेत, त्या पटकथेत आहेत. हा सूरजचा बायोपिक नाही. ही एक हृदयस्पर्शी प्रेमकथा आहे. कारण मी ‘अगं बाई अरेच्चा!’ केला, ‘जत्रा’ केला, ‘बाईपण भारी देवा’पर्यंत माझ्या सगळ्या गोष्टी कौटुंबिक मनोरंजनाच्या आहेत. ‘झापुक झुपूक’मधला मॅडनेस थोडा ‘जत्रा’मधला आहे. मला हा सिनेमा करताना सूरज हे डिव्हाइस मिळालं. त्याने फारच अप्रतिम काम केलंय.

View this post on Instagram

A post shared by Jio Marathi (@jiostudiosmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी २४ वर्ष या इंडस्ट्रीत चित्रपट करणारा माणूस आहे. मला जेवढे कलाकार माहिती आहेत, त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. या अनुभवाने मी सांगतो की, सूरजला आजपर्यंत त्यांनी रीलस्टार म्हणून बघितलं आहे. जेव्हा ते त्याला मोठ्या पडद्यावर बघितली आणि जेव्हा तुमचं तो मनं जिंकेल. तेव्हा मला खात्री आहे आणि आजपर्यंतचा विश्वास आहे. माझ्या शब्दावर रसिक प्रेक्षकांनी तो विश्वास ठेवलाय. ‘बाईपण भारी देवा’ला भरमसाट गर्दी केलीये. त्यामुळे या गोष्टीवर विश्वास ठेवून तु्म्ही चित्रपटगृहामध्ये या. नक्की बाहेर येऊन तुम्ही आणखी २५ लोकांना सांगाल. सूरज चव्हाण काय आहे,” असं केदार शिंदे म्हणाले.