‘टाइमपास’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू-प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणी एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट टाइमपास ३ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मात्र नुकतंच या चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप नोंदवला जात आहे.
सध्या टाइमपास ३ या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे प्रेक्षक भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत. मात्र या चित्रपटातील एका दृश्यावर मराठी एकीकरण समितीकडून आक्षेप घेतला जात आहे. या चित्रपटात राष्ट्रभाषेसंबंधी माहितीवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
मराठी एकीकरण समितीने नुकतंच फेसबुकवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी टाइमपास ३ या चित्रपटाबद्दल संताप व्यक्त केला आहे. “रवी जाधव…, तुमच्या चित्रपटात #हिंदी #राष्ट्रभाषा अशी खोटी माहिती दाखवली आहे. राष्ट्रभाषा असण्याचे पुरावे द्या अन्यथा माफी मागा. अफवा पसरवणे गुन्हा असून तो आपण करत आहात, चित्रपटातील ते दृश्य तातडीने काढून टाकावे. आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल ही अपेक्षा”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सध्या मराठी एकीकरण समितीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. यावर एकाने खूप सारे मराठी माणसे हिंदीला राष्ट्रभाषा समजतात…. आणि सांगून पण ऐकत नाहीत…., अशी कमेंट केली आहे. हो आताच पाहिला movie.. त्यात चुकीचे सांगितले. हिंदी राष्ट्र भाषा म्हणून, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. कोणत्याही मराठी माणसाला लाज वाटायला हवी, “हिंदी” ही राष्ट्रभाषा आहे असे म्हणताना. आणि हे वस्तुस्थितीला धरून देखील नाही. जर या चित्रपटात देखील हीच चूक झाली असेल तर याची गंभीर दखल घ्यायला हवी आणि कायदेशीर कारवाई देखील करायला हवी, असेही एक नेटकरी कमेंट करताना म्हणाला आहे.
पाहा व्हिडीओ –
‘टाइमपास-३’ पाहिल्यानंतर हृता दुर्गुळेच्या सासूबाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “आता तिच्यात…”
या चित्रपटात प्रथमेश परब, हृता दुर्गुळे, वैभव मांगले, भाऊ कदम, आरती वडगबाळकर, संजय नार्वेकर हे कलाकार पाहायला मिळत आहे. . या चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. तर संगीत अमितराज यांचं आहे. या चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून प्रियदर्शन जाधव याने चित्रपटाची पटकथा आणि सवांद लिहिले आहेत. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या टाइमपास ३ चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. शुक्रवारी २९ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.