तांत्रिकदृष्टय़ा-आशयदृष्टय़ा प्रगल्भ चित्रपट, ओव्हर द टॉप (ओटीटी)सारख्या नवीन माध्यमांचा वाढता प्रभाव या दोन्ही गोष्टी असल्या तरी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि त्यांचा प्रेक्षक यांच्यातील घनिष्ट नातं अजूनही टिकून आहे. मात्र याचा फटका मालिकेची लोकप्रियता आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद यांच्यातील गणित मांडणाऱ्या टीआरपी नावाच्या समीकरणाला निश्चितच बसला आहे. हिंदी मनोरंजनवाहिन्या, त्यांच्या उपवाहिन्या, ओटीटी वाहिन्या आणि मराठी वाहिन्या इतक्या माध्यमांवरचा मुबलक आणि सहजपणे उपलब्ध होत असलेल्या आशयामुळे साहजिकच मालिका निवडीबाबत प्रेक्षक अधिक चोखंदळ झाले आहेत. त्यामुळे टीआरपी बोले मालिका हाले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. टीआरपी कमी झाला की कथा बदला, मालिकेची वेळ बदला, नवीन पात्रं आणा.. आणि तरीही टीआरपी बधलाच नाही तर मालिका बंद करा असा निर्णय थेट वाहिनीकडून घेतला जातो.
‘लोकमान्य’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकेला याच टीआरपीच्या कारणावरून वेळेआधी निरोप घ्यावा लागतो आहे. गेल्या वर्षभरात अशा कित्येक मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम टीआरपी अभावी बंद करावे लागले आहेत.
टीआरपी नेमका का घसरतो ? अचानक का वाढतो? याचे ठरावीक असे काही ठोकताळे नाहीत. एखादी चांगली चालत असलेली लोकप्रिय मालिका अचानक बंद पडते किंवा त्याची वेळ बदलून संध्याकाळी लवकर वा रात्री उशिरा दाखवली जाते. तेव्हाच बहुधा मालिकेची अखेरची घरघर सुरू झाली असावी अशी शंका प्रेक्षकांच्याही मनात चुकचुकायला लागते. ‘झी मराठी’ वाहिनीवर बुधवार ते शनिवार दाखवण्यात येणारी ‘लोकमान्य’ ही ऐतिहासिक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ही मालिका सुरू करण्यात आली होती. नितीन वैद्य यांच्या दशमी क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेत अभिनेता क्षितिश दाते याने लोकमान्य टिळक यांची भूमिका केली आहे, तर टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका अभिनेत्री स्पृहा जोशीने केली आहे.
उत्तम आशय, निर्मिती आणि चांगले कलाकार असूनही टीआरपी कमी असल्याने वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही ‘झी मराठी’ वाहिनीने टीआरपी कमी आहे या कारणास्तव अनेक नवीन मालिका बंद केल्या. ‘लोकमान्य’ मालिकेबरोबरच आलेली ‘अगं अगं सूनबाई.. काय म्हणता सासूबाई’ ही निखळ विनोदी हलकीफुलकी मालिकाही टीआरपी कमी असल्याने मे महिन्यात बंद करण्यात आली. त्याआधी नोव्हेंबरमध्ये सुरू झालेली ‘हृदयी प्रीत जागते’ ही मालिकाही मे महिन्यात बंद करण्यात आली. त्याआधी मालिकेच्या प्रसारणवेळेत बदल करूनही चाचपणी करण्यात आली होती.
‘झी मराठी’च नव्हे तर ‘कलर्स मराठी’वरही टीआरपी नसल्याने ‘शेतकरीच नवरा हवा’ ही मालिका नुकतीच बंद करण्यात आली आहे. ‘स्टार प्रवाह’वर ‘स्वाभिमान’ आणि ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘मुलगी झाली हो’ या तीन मालिका बंद करण्यात आल्या तेव्हा प्रेक्षकांकडून टीका झाली. मात्र तुलनेने त्या मालिका वर्ष – दोन वर्ष सुरू होत्या. ‘सोनी मराठी’ वाहिनीवर ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिकाही दोनच महिन्यात बंद करण्यात आली. टीआरपीचा हा फटका केवळ मालिकांनाच बसतो असं नाही. कथाबाह्य कार्यक्रमांनाही या गणितांना सामोरं जावं लागतं. ‘झी मराठी’ वाहिनीवर नऊ वर्षांनी ‘फुबाईफु’चे नववे पर्व गाजावाजा करत सुरू झाले, मात्र हाही कार्यक्रम टीआरपी न मिळाल्याने बंद करावा लागला.
कोणत्या मालिकांना टीआरपी जास्त मिळतो, कमी मिळतो याबाबत आडाखे बांधणं शक्य नसतं. असे ठरावीक ठोकताळे नसतात. एखाद्या मालिकेच्या कथानकात झालेला बदल प्रेक्षकांना पटला नाही तरी चांगल्या सुरू असलेल्या मालिकेला मिळणारा प्रतिसाद कमी होत जातो, अशी माहिती ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी दिली.
टीआरपी मिळाला नाही तर वाहिनीला त्या मालिकेदरम्यान मिळणाऱ्या जाहिराती कमी होतात. त्यामुळे वाहिनीने टीआरपी कमी मिळत असल्याने मालिका बंद करण्याचा घेतलेला निर्णय मान्य असल्याचे सांगतानाच मालिका कोणत्या वेळेला प्रसारित केल्या जातात हेही तितकंच महत्त्वाचं आहे, असं निर्माते नितीन वैद्य यांनी एका मुलाखतीत नमूद केलं होतं. मात्र त्यामुळे ‘लोकमान्य’सारख्या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या मालिकेला फटका बसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली.
टीआरपी कमी होतो आहे हे लक्षात आल्यानंतर मालिका लगेच बंद केली जात नाही. वेळ बदलणे आणि अन्य पर्याय चोखाळून पाहिले जातात. याविषयी ‘कलर्स मराठी’ वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख विराज राजे यांनी सांगितले, ‘मालिकांना अनेक वेळा प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला असतो, पण या टीआरपीच्या स्पर्धेत जर मालिका कमी पडत असेल तर त्यासाठी अनेक पर्याय वापरले जातात. अशा वेळी मालिकेत थोडा बदल केला जातो, नवीन पात्रं आणली जातात, तरीही टीआरपीमध्ये वाढ नाही झाली तर त्याचा परिणाम पुढील मालिकांना होऊ लागतो म्हणून अनेक वेळा प्रेक्षकांना आवडत असली तरी मालिका लवकर बंद करावी लागते. तर काही वेळा मालिकेची वेळही बदलली जाते. अशा वेळी त्या मालिकेचे नेहमीचे प्रेक्षक नव्या वेळेतही मालिका पाहतील हा विश्वास निर्मात्यांनाही असावा लागतो’. मुळात सध्या प्रेक्षकांकडे मनोरंजनासाठी अनेक पर्याय दूरचित्रवाहिनीवरही उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात हिंदी वाहिन्या, त्यांच्या उपवाहिन्या, चित्रपट वाहिन्या आणि ओटीटीचा आशय अशा सगळय़ांशीच मराठी मनोरंजन वाहिन्यांना स्पर्धा करावी लागते आहे, याकडे सतीश राजवाडे यांनी लक्ष वेधले. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या मालिका सर्वाधिक टीआरपी मिळवणाऱ्या पहिल्या दहा मालिकांमध्ये आहेत. वाहिनीच्या स्वत:च्याच मालिकांमध्ये सध्या टीआरपीची रस्सीखेच पाहायला मिळते आहे. आत्तापर्यंत ‘आई कुठे काय करते’ ही सर्वाधिक टीआरपी असणारी मालिका होती. सध्या ती जागा ‘ठरलं तर मग’ या नव्या मालिकेने घेतली आहे. ‘मालिका, चित्रपट, नाटक कोणतीही कलाकृती असो ती प्रेक्षकांसाठी आणि त्यांच्यावर अवलंबून असते. ती आवडली तरच चित्रपटगृहात चित्रपटासाठी आणि मालिकेला टीआरपीची गर्दी मिळते. रसिक प्रेक्षक फार चोखंदळ आणि फार हुशार आहेत, चांगलं काय याची त्यांना संपूर्ण जाणीव आहे. त्यांच्याकडे सध्या इतके पर्याय उपलब्ध आहेत त्यातून त्यांना नेमकं जे आवडतं तेच निवडतात’, असे राजवाडे यांनी सांगितलं. त्यामुळे मालिका सादर करताना राज्याच्या विविध प्रांतातील गोष्टी आणि लोकांना आपल्याशा वाटतील अशा मालिका सादर करण्यावर वाहिनीचा भर असतो असेही त्यांनी स्पष्ट केले. कितीही नवीन माध्यमे आली तरी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि त्यांची टीआरपीसाठीची दमछाक यापुढेही अशीच सुरू राहणार आहे याची जाणीव वाहिन्यांना आणि निर्मात्यांना आहे. त्यामुळे सतत नव्या मालिका आणणं आणि त्या आवडल्या नाहीत तर अजून नवीन काही आणणं हे प्रयोग यापुढेही वाहिन्यांना करावे लागणार आहेत.