पुणे : नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातील एका गृहप्रकल्पाच्या आवारातून चोरट्यांनी ‘महावितरण’चे रोहित्र (ट्रान्सफाॅर्मर) चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला.याबाबत ‘महावितरण’चे सहायक अभियंता दीपक बाबर यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीतील एका गृहप्रकल्पासाठी ‘महावितरण’कडून २०२० मध्ये उच्च क्षमतेचे राेहित्र बसविण्यात आले होते. तेथे असलेले जुने रोहित्र गृहप्रकल्पाच्या आवारात पडून होते.

‘महावितरण’चे कर्मचारी नीलेश तिजारी १९ एप्रिल रोजी गृहप्रकल्पाच्या आवारातील विद्युत मीटरचे रीडिंग घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी जुने रोहित्र जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी गृहप्रकल्पाच्या आवारातून रोहित्र कसे चोरून नेले, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित्राची तोडफोड करणारी टोळी

पुणे जिल्ह्यात रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरून नेणारी चोरट्यांची टोळी सक्रिय आहे. रोहित्रात तांत्रिक छेडछाड करून ते बंद केले जाते. त्यानंतर चोरटे रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरून नेतात. त्या भंगार व्यावसायिकांना विकण्यात येतात. यापूर्वी पुणे पोलीस, तसेच ग्रामीण पोलिसांनी रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरणाऱ्यांना अटक केली आहे.