गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लता मंगेशकरांच्या जयंतीनिमित्त अयोध्येतील एका मोठ्या चौकाला लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं. त्याशिवाय या चौकात एक ४० फूट आणि १४ टन वजनाच्या वीणेची मूर्ती ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मूर्तीचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. यानिमित्ताने एका मराठमोळ्या गायिकेला गाणे गाण्याची संधी मिळाली. याबद्दल तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी मराठमोळी गायिका म्हणून सावनी रविंद्रला ओळखले जाते. तिने आपल्या मधूर आवाजाने मराठी कलाविश्वात एक दबदबा निर्माण केला आहे. तिचे लाखो चाहते आहेत. दिवसागणिक तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच या कार्यक्रमाचा तिचा अनुभव नेमका कसा होता? याबद्दलही तिने पोस्ट करत सांगितले आहेत.
आणखी वाचा : ‘#घरापासून_दूर तुम्हाला काय वाटतं?’ मराठी सिनेसृष्टीचा आगळावेगळा ट्रेंड; आठवणी सांगताना कलाकार भावूक

सावनी रविंद्रची पोस्ट

“गुरुकृपा !!!
माझ्या आयुष्यातल्या अविस्मरणीय दिवसांपैकी एक दिवस !!

माँ सरस्वती भारतरत्न लतादीदींच्या प्रथम जयंती निमित्त,प्रभू रामचंद्रांच्या अयोध्यानगरीत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सरस्वती वीणा आणि लता मंगेशकर चौकाचे उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या हस्ते झाले.प्रमुख उपस्थिती होती उत्तर प्रदेश मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजिंची! आणि या उद्घाटनप्रसंगी दीदींनी गायलेली श्रीराम भजने गाण्याची संधी आदरणीय आदिनाथ दादा यांनी मला दिली!

योगी आदित्यनाथ जी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला! अयोध्येत घडलेलं प्रभू रामचंद्रांचं दर्शन आणि त्याच ठिकाणी श्रीराम भजन गाण्याची संधी मिळणं हा दीदींचा आणि मा.दीनाबाबांचा मला मिळालेला कृपाशीर्वादच आहे असं मी मानते ! आदिनाथ दादा, मला ही अलौकिक संधी दिल्याबद्दल तुमचे शतशः आभार!
जय श्रीराम !”, असे तिने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : … म्हणून मी लग्न केले नाही, लता मंगेशकर यांनी स्वत: सांगितले होते कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सावनी रविंद्र हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. सावनीने मराठीसह तेलुगू, मल्याळम, कन्नड, तामिळ भाषेतूनही अनेक गाणी गायली आहेत. तिच्या ‘वेन्निलविन सालईगलिल’ या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तिने ‘पसंत आहे मुलगी’, ‘कमला’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ यासारख्या अनेक मालिकांची शीर्षकगीतं गायली आहेत.