ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून कमलाकर नाडकर्णी हे आजारी होते. त्यांच्या निधनानंतर नाट्यविश्वावर शोककळा पसरली आहे. नुकतंच एका अभिनेत्याने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता सुशील इनामदार हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सुशील इनामदारने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने कमलाकर नाडकर्णी यांचा फोटो शेअर केला आहे. त्याबरोबर त्यांनी कॅप्शन लिहित किस्साही सांगितला आहे.
सुशील इनामदारची पोस्ट
“अचानक एक क्षण सगळं स्तब्ध होतं. आजूबाजचं भान रहात नाही. अक्षरश: बहिरे होतो. तसंच काहीस झालं. Baba passed away हा नमिताचा मेसेज वाचून अगदीच तसं झालं.
तुमच्या आयुष्याशी कोण कसं जोडलं जाईल हे काहीच सांगता येत नाही. कमलाकर काका असेच जोडले गेले. म्हणजे मला त्यांचा सहवास लाभला असं म्हणता येईल. एकतर नाट्य समिक्षेमधील एक मोठं नाव. प्रचंड वाचन . शार्प मेमरी. म्हणजे त्यांना कोणत्याही काळातील नाटकाबद्दल विचारा पाठांतर केल्यासारखं बोलणार.
बरेच वर्ष अभिनय क्षेत्रापासून लांब राहिल्या वर जेव्हा पुन्हा नाटक सुरू केलं तेव्हा “द डेथ ॲाफ अ कॅान्करर्” या नाटकाच्या एका प्रयोगाला ते येणार असल्याच दिग्दर्शक सुनिल कदम सर बोल्ले. मी तर धसकाच घेतला. कारण त्यांची परिक्षणं सुरवातीला व्यावसायिक नाटकात काम केल्यामुळे वाचनात आली होती . एखादं नाटक नाही आवडलं तर झोडपून काढायचे. पण त्यांनी हिटलर डोक्यावर घेतला. खूप कौतुक केलं. आणि पुढल्या वर्षी मी अनुवाद केलेलं “हिरोशीमा” नाटक करा असा प्रेमळ सल्ला देखील दिला. आमच्या डिपार्टमेंटने केलं देखील. तेव्हा पुर्ण प्रोसेस मध्ये डॅा हेमू अधिकारी आणि कमलाकर काका यांनी मोलाची मदत केली. तेव्हापासून त्यांच्या संपर्कात आलो. वेळोवेळी मार्गदर्शन केलं.
माझी पहिला दैनंदिन मालिका “ गोठ “ त्यांच्यामुळेच मला मिळाली. एक दिवस त्यांचा अचानक फोन आला….मालिका करणार का ? माझी मुलगी नमिता वर्तक करतेय. तिने काही भागांच वाचन आत्ता घरी केलं तर मला तुम्ही डोळ्यांसमोर आलात. छान आहे भुमिका. करा. त्यांनी सांगीतल्यावर नाही म्हणायला जागाच नव्हती.
त्यांच आणि माझं शेवटचं संभाषण म्हणजे उद्ध्वस्त धर्मशाळा करतोय हे सांगण्यासाठी त्यांना फोन केला होता. कराकरा..अत्यंत महत्वाच नाटक…त्याचे संदर्भ बघणाऱ्याला आजही नक्की जाणवतील. शुभेच्छा तुम्हाला आणि टिमला. तब्येतीनं साथ दिली तर नक्की येईन प्रयोगाला. हे शेवटचं संभाषण.
काका तुम्ही चालते बोलते नाटकाची डिक्शनरी होता. आता काय पानं विस्कटली.
मात्र तुमचं ते सातमजली हासणं कायम लक्षात राहील….
कमलाकर नाडकर्णी….जयंत पवार यांच्या सारखे नाट्य समिक्षक जाणे हि नाट्य सृष्टीची मोठी हानी आहे”, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
दरम्यान कमलाकर नाडकर्णी यांनी ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकातून नाट्य समीक्षा लिहिण्यास त्यांनी सुरूवात केली. ‘महानगरी नाटक’, ‘राजा छत्रपती’ हे बालनाट्य, ‘नाटकी नाटक’ ही पुस्तके लिहिली आहे. कमलाकर नाडकर्णी हे सुरूवातीच्या काही वर्षांमध्ये सुधा करमकर यांच्या बालनाट्य संस्थेत लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून कार्यरत होते. त्यांची लेखनशैली खूप ओघवती आणि उत्तम होती. नाटक पाहिलं की त्यातले बारकावे टिपून दिग्दर्शक, कलाकरांच्या चुकांवर नेमकं बोट ठेवण्याचं काम ते आपल्या लेखनातून करत असत. एखादा प्रयोग रंगला तर तो का? किंवा का रंगला नाही याचं विश्लेषण करण्यात कमलाकर नाडकर्णी यांचा हात कुणीही धरू शकणार नाही.