Marathwada Flood Nana Patekar and Makarand Anaspure Helps : मराठवाडा, धाराशिव, सोलापूरसह नजीकच्या जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरानं सबंध महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. आठवडाभरापासून मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे. धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यासह अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. नद्यानाल्यांना पाणी आल्याने जनजीवनच विस्कळीत झालं आहे. या पुरानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

त्यामुळे राज्य शासन आणि काही संस्था शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. अशातच मराठी इंडस्ट्रीमधील काही कलाकारांनीसुद्धा मदत जाहीर केली आहे. प्रवीण तरडे, ऋतुराज फडकेसह, सौरभ चौघुले या कलाकारांनी मदतीचं आवाहन केलं आहे. या पूरजन्य परिस्थितीतील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘नाम फाउंडेशन’कडूनही मदत जाहीर करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीला नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तसंच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत त्यांनी इतरांनासुद्धा मदतीचं आवाहन केलं आहे. ‘नाम फाउंडेशन’च्या सोशल मिडिया अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओत नाना पाटेकर म्हणतात, “या पुरात तीस जिल्हे बाधित आहेत. मराठवाडा आणि सोलापूर या जिल्ह्यांवर अधिक परिणाम झाला आहे. यातून झालेलं नुकसान न भरून येणारं आहे. सरकार त्यांच्यावतीने मदत करतच आहे, आपणही आपल्या परीने काय करता येईल ते बघूया. ‘नाम’च्या मदतीने जेवढं करता येईल तेवढं करूयात. आपण त्यांच्यावर काही उपकार करत नाही. शेतकऱ्यांवर आलेल्या संकटात आपण मदत करणं आवश्यक आहे.”

पुढे मकरंद अनासपुरे म्हणतात, “मराठवाड्याने या आधी कधीही असा पाऊस अनुभवला नाही. या पुरामुळे महाराष्ट्रातील ३० जिल्हे बाधित झाले आहेत. यामुळे जवळपास ५० लाख हेक्टर पिकांचं आणि फळबागांचं नुकसान झालं आहे. याशिवाय खूप जीवितहानी झाली आहे. पशुधनही बाधित झालं आहे. गायी, म्हशी, बैल आणि शेळ्यांची जीवितहानी झाली आहे. अनेक घरांचंसुद्धा नुकसान झालं आहे. हे अस्मानी संकट महाराष्ट्रावर आलं आहे.”

पुढे ते म्हणतात, “सगळ्या दानशूर व्यक्तींना आवाहन आहे की, या संकटाचा सामना करताना आपण बळीराजा आणि सामान्य लोकांना मदत करूया. कुणीही खचून जाऊ नये आणि अविचार करू नये, ही विनंती. मदतीला सुरुवात झाली आहे. तसंच पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना उभारी मिळेल आणि बळीराजा पुन्हा नव्याने उभा राहील यासाठी आपण एकत्र येऊन मदत करूया; हेच आवाहन.” दरम्यान, या व्हिडीओखालील अनेकांनी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या कृतीचं कौतुक केलं आहे.