नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय अमेरिकन टीव्ही शो ‘फ्रेंड्स’मध्ये चँडलरची भूमिका साकारणारे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे काहीच महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लास वेगास येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह घरातील हॉट टबमध्ये बुडालेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला असून अजूनही कित्येक चाहते यातून सावरलेले नाहीत.

अशातच आता मॅथ्यू पेरी यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं आहे ज्यामुळे बऱ्याच लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. दिवंगत अभिनेते मॅथ्यू पेरी यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण केटामाइन हे ड्रग असल्याचे समोर आले आहे. डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी जे उपचार घेतले जातात त्यादरम्यान या ड्रगचा सर्वाधिक वापर केला जातो असं सांगितलं जातं.

आणखी वाचा : “तुम्ही अक्षय कुमारची सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात पाहा…”, चित्रपटावर टीका करणाऱ्यांना ‘अ‍ॅनिमल’फेम अभिनेत्याचं उत्तर

मॅथ्यू पेरी यांच्या रक्तात उच्च प्रमाणात केटामाइनचे अवशेष आढळून आल्याचं या अहवालात उघड झालं आहे. याचाच अर्थ मॅथ्यू पेरी हे डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी उपचार घेत होते अन् त्यादरम्यान वापरण्यात आलेल्या काही ड्रगचा परिणाम त्यांच्या शरीरावर झाला अन् त्यामुळेच त्यांचा मृत्यू ओढवला असल्याचं आता स्पष्ट होत आहे. अर्थात त्यांना हे केटामाइनचे डोस नेमके कोणाच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येत होते त्याबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही.

‘फ्रेंड्स’च्या चित्रीकरणादरम्यानही मॅथ्यू हे बऱ्याचदा दारूच्या नशेत असायचे हे त्यावेळच्या सहकलाकारांनीही सांगितलं होतं. सीरिजमधील इतर कलाकारांनीही त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी बरीच मदत केली होती. ‘पीपल मॅगजीन’च्या एका मुलाखतीमध्ये मॅथ्यू यांनी ही गोष्टदेखील कबूल केली की त्यांना वर्षातून किमान १५ वेळा व्यसनमुक्तीसाठीच्या सुधारगृहात जावं लागत असे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतकंच नव्हे २०१८ मध्ये न्यूमोनिया, कोलोन इन्फेक्शन आणि अन्य काही गोष्टींमुळे मॅथ्यू यांना रुग्णालायात दाखल केलं गेलं होतं. त्यावेळी ते चक्क दोन आठवडे कोमात होते आणि त्यान लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. ‘चार्ल्स इन चार्ज’ या चित्रपटातून मॅथ्यू पेरी यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. पण त्यांना खरी प्रसिद्धी टीव्ही मालिका ‘फ्रेंड्स’मधून मिळाली. ही मालिका २२ सप्टेंबर १९९४ रोजी सुरू झाली आणि ६ मे २००४ रोजी संपली. ‘फ्रेंड्स’चे दहा सीझन आले. तर त्यानंतर त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमधून काम केलं आहे.